विदेशी पर्यटकांनाही केले बंदिस्त ः काही वेळानंतर सुटका ः अटकेतील दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील एका मंत्री आणि काही पर्यटकांचे अपहरण करत त्यांना वेठीस धरल्याने शनिवारी खळबळ निर्माण झाली. या बदल्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या जिहादींची सुटका करण्याची मागणी केली होती. ही घटना खैबर पख्तूनख्वा आणि गिलगिट बाल्टिस्तान भागात घडल्याची माहिती देण्यात आली. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे बोलले जात आहे. दहशतवाद्यांनी आपली मागणी पूर्ण करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाला (केपी) गिलगिट-बाल्टिस्तानशी (जीबी) जोडणाऱया मुख्य रस्त्यावर दहशतवाद्यांनी काही जणांना घेरले. यामध्ये काही विदेशी पर्यटकही होते. याचदरम्यान पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल्ला बेग हे इतर दोन लोकांसह इस्लामाबादहून गिलगिटला जात होते. यादरम्यान त्यांचेही अपहरण करण्यात आले. नंतर दहशतवाद्यांनी सर्वांना सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर मंत्री बेग यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे.
यापूर्वीही दहशतवाद्यांची क्रूर कृत्ये
अपहरणकर्त्यांच्या सुटकेची मागणी करणाऱया दहशतवाद्यांनी नंगा पर्वत प्रदेशात परदेशी नागरिकांची भीषण हत्या केली होती. याशिवाय डायमेरमधील इतर दहशतवादी घटनांमध्ये हे दहशतवादी सहभागी होते. गिलगिट-बाल्टिस्तानचा मोस्ट वाँटेड दहशतवादी हबीबुर रहमान याने हे अपहरण केल्याचे सांगण्यात येत आहे. हबीबुर रहमानवर नंगा पर्वतमध्ये 10 परदेशी नागरिकांची हत्या केल्याचा आरोप आहे. बंदी घातलेल्या संघटनेकडून दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली. तसेच दहशतवाद्यांनी प्रांतात इस्लामिक नियम लागू करण्याची आणि महिलांना खेळापासून दूर ठेवण्याची मागणीही केल्याचे समजते.