वृत्तसंस्था/ कराची
मोहमद रिझवान आणि हॅरिस रौफ यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात यजमान पाकिस्तानने इंग्लंडचा केवळ 3 धावांनी पराभव करत सात सामन्यांच्या या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. 32 धावांत 3 गडी बाद करणाऱया हॅरिस रॉफला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या चौथ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकात 4 बाद 166 धावा जमवित इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 167 धावांचे आव्हान दिले. पण इंग्लंडचा डाव 19.2 षटकात 163 धावांत आटोपल्याने पाकने हा सामना केवळ 3 धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी साधली.
पाकच्या डावामध्ये सलामीच्या मोहम्मद रिझवानने दमदार अर्धशतक झळकवताना 67 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 88, कर्णधार बाबर आझमने 28 चेंडूत 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. रिझवान आणि बाबर आझम या सलामीच्या जोडीने 11.5 षटकात 97 धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या डॉसनने बाबर आझमला डकेटकडे झेल देण्यास भाग पाडले. आझम बाद झाल्यानंतर रिझवान आणि शान मसूद यांनी दुसऱया गडय़ासाठी 52 धावांची भर घातली. मसूदने 19 चेंडूत 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. खुशदिल शहा 2 धावांवर बाद झाला. डावातील शेवटच्या षटकात मोहम्मद रिझवान टॉप्लेच्या गोलंदाजीवर हॅलेसकरवी बाद झाला. त्याने या मालिकेत सातत्याने फलंदाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी शेवटच्या दहा षटकांमध्ये पाकच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळविले. असीफ अलीने 2 षटकारांसह नाबाद 13 तर मोहम्मद नवाजने नाबाद 1 धाव जमविली. इंग्लंडतर्फे टॉप्लेने 37 धावांत 2 तर डॉसन आणि विली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकच्या डावामध्ये 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहम्मद हसनेन आणि मोहम्मद नवाज यांच्या अनुक्रमे वेगवान आणि फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडची आघाडीची फळी झटपट कोलमडली. पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोहम्मद नवाजने सलामीच्या सॉल्टला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. त्यानंतर दुसऱया षटकात मोहम्मद हसनेनने हॅलेसला कादिरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. मोहम्मद हसनेनने आपल्या याच षटकातील शेवटच्या चेंडूवर इंग्लंडच्या जॅक्सचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडविला. दोन षटकाअखेर इंग्लंडची स्थिती 3 बाद 14 अशी केविलवाणी झाली होती. डकेट आणि बुक या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 43 धावांची भर घातली. मोहम्मद नवाजने डकेटला पायचीत केले. त्याने 24 चेंडूत 5 चौकारांसह 33 धावा जमविल्या. मोहम्मद नवाजने कर्णधार मोईन अलीचा त्रिफळा उडविला. तत्पूर्वी मोईन अली आणि ब्रुक या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 49 धावांची भागीदारी केली होती. ब्रुकने 29 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 34 धावा जमविल्या. मोहम्मद वासीमने बुकला हसनेनकरवी झेलबाद केले. मोईन अलीने 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 29 धावा जमविल्या. डेव्हिड विलीने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. रौफने त्याचा त्रिफळा उडविला. डॉसनने एकाकी लढत देत 17 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 34 धावा जमविल्या. रशिद 3 धावांवर नाबाद राहिला. रौफने स्टोनला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. शान मसूदच्या अचूक फेकीवर टॉप्ले धावचित झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडला शेवटच्या षटकात विजयासाठी 4 धावांची जरुरी होती. पण मसूदने टॉप्लेला धावचीत केल्याने इंग्लंडचा डाव 163 धावात आटोपला. पाकने हा सामना 4 चेंडू बाकी ठेवून 3 धावांनी जिंकला. इंग्लंडच्या डावामध्ये 3 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे मोहम्मद नवाजने 35 धावात 3, रौफने 32 धावात 3, मोहम्मद हसनेनने 40 धावात 2 तर मोहम्मद वासीमने 30 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः पाक 20 षटकात 4 बाद 166 (मोहम्मद रिझवान 88, बाबर आझम 36, शान मसूद 21, असीफ अली नाबाद 13, खुशदिल शहा 2, मोहम्मद नवाज नाबाद 1, टॉप्ले 2-37, डॉसन 1-32, विली 1-31), इंग्लंड 19.2 षटकात सर्वबाद 163 (डॉसन 34, ब्रुक 34, डकेट 31, मोईन अली 29, विली 11, सॉल्ट 8, मोहम्मद नवाज 3-35, हॅरिस रौफ 3-32, मोहम्मद हसनेन 2-40, मोहम्मद वासीम 1-30).