बाबर आझम-इफ्तिकारची शतके, रिझवानची शानदार खेळी, शदाब खानचे 4 बळी
वृत्तसंस्था/ मुलतान
आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार व सामनावीर बाबर आझम (151) आणि इफ्तिकार (नाबाद 109) यांचा तुफानी शतकी खेळ आणि शदाब खानची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर पाकने नेपाळवर तब्बल 238 धावांनी दणदणीत विजय मिळविला.
पाकिस्तानने निर्धारित 50 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 342 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दुबळ्या नेपाळला 23.4 षटकांत 104 धावांत गुंडाळून विजय साकार केला. शदाब खानने 27 धावांत 4, हॅरिस रौफ व शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी 2, नसीम शहा व मोहम्मद नवाझ यांनी एकेक बळी मिळविला. नेपाळच्या आरिफ शेख (26), सोमपाल कामी (28), गुलशन झा (13) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.
बाबर-इफ्तिकारची शानदार अर्धशतके
बाबरने इफ्तिकारसोबत पाचव्या विकेटसाठी 214 धावांची पाकतर्फे विक्रमी भागिदारी साकारली. इफ्तिकारने अवघ्या 71 चेंडूमध्ये 11 चौकार व 4 षटकारासह 109 धावांची खेळी केली. तर बाबर आझमने 131 चेंडूत 151 धावांची खेळी केली. यामध्ये 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. इफ्तिकारचे वनडेतील पहिलेच शतक ठरले. या दोघांनी नेपाळच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
करताना तुफानी फटकेबाजी केली. यामुळेच पाकिस्तानला 50 षटकांत 6 बाद 342 धावांपर्यंत मजल मारता आली. नेपाळकडून सोमपाल कामीने 2 बळी घेतले. करण केसी आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
नवख्या नेपाळपुढे पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात परतले, पण बाबर आझम याने पाकिस्तानचा डाव सांभाळला. सलामीवीर फखर झामन 14 तर इमाम उल हक 5 धावांवर तंबूत परतला. यानंतर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने मोहम्मद रिझवानसोबत 86 धावांची भागिदारी केली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना रिझवान 44 धावा काढून बाद झाला. यानंतर आगा सलमानही फार काळ मैदानात टिकला नाही. 5 धावांवर त्याला लामिछेनेने बाद केले. एका बाजूला विकेट पडत असताना बाबरने दमदार फलंदाजी साकारली.
बाबर आझम सुसाट, हाशिम आमला, विराटला टाकले मागले
आशिया चषक स्पर्धेत नेपाळविरुद्ध पहिल्याच सामन्यात पाक कर्णधार बाबर आझमने शानदार शतकी खेळी साकारली. या शतकानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आझमने नेपाळविरुद्ध वनडे कारकिर्दीतील 19 वे शतक झळकावले. त्याने 102 डावात 19 शतके झळकावली. या कामगिरीसह आझम सर्वात कमी डावात 19 शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला आहे. आमलाने 104 डावात 19 शतके ठोकली आहेत. सर्वात जलद 19 शतके करण्याच्या यादीत भारताचा दिग्गज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 124 डावांमध्ये 19 शतकांचा आकडा गाठला होता. याचबरोबर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर चौथ्या स्थानी असून त्याने 139 डावात 19 शतके केली आहेत.
नेपाळ आशिया चषक खेळणारा आठवा संघ
नेपाळचा संघ पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळत आहे. 20 वर्षीय रोहित पौडेल याच्याकडे नेपाळच्या संघाची धुरा आहे. याआधी भारताशिवाय पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ या स्पर्धेत खेळले आहेत. अशाप्रकारे नेपाळ हा आशिया कप खेळणारा आठवा संघ ठरला आहे.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 50 षटकांत 6 बाद 342 (फखर झमन 14, इमाम उल हक 5, बाबर आझम 131 चेंडूत 151, रिझवान 44, आगा सलमान 5, इफ्तिकार अहमद 71 चेंडूत नाबाद 109, शादाब खान 4, सोमपाल कामी 85 धावांत 2 बळी, करण केसी, लामिछाने प्रत्येकी एक बळी), नेपाळ 23.4 षटकांत सर्व बाद 104 : सोमपाल 28, आरिफ शेख 26, शदाब खान 4-27.