पणजी पोलिसांच्या यशस्वी कारवाईत चोरटा गजाआड : लोटलीकर अँड कंपनीमध्ये पूर्वी कामाला होता चोरटा
प्रतिनिधी /पणजी
पणजीत एका फ्लॅटमध्ये चोरी करून संशयिताने रोख रक्कमेसह सुमारे 18 लाख 15 हजार रुपये किमंतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत रमेश लोटलीकर यांनी तक्रार दाखल असता पणजी पोलिसांनी त्वरित कारवाई करून संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात भादंसंच्या 381 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव मारुती बासवानी हेगडे (34 वर्षे) असे आहे. संशयित मूळ कर्नाटक येथील असून तो खारेबांध येथे राहत होता. तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्या असता संशयिताची ओळख पटली व मोबाईल लोकेशनद्वारे संशयिताला अटक केली. संशयित हा लोटलीकर अँड कंपनीचा माजी कर्मचारी असून त्याने बरीच वर्षे रमेश लोटलीकर यांच्याकडे काम केले होते. नंतर त्याने काम सोडले होते. काम करीत असतानाच त्याने फ्लॅट तसेच आतील लॉकरच्या डय़ुप्लिकेट चाव्या तयार केल्या होत्या. त्या चाव्यांद्वारे फ्लॅटमध्ये प्रवेश केला. लॉकरमधील सोन्याचे दागिने, महागडय़ा मद्याच्या बाटल्या, रोख रक्कम 5 लाख रुपये तसेच अन्य सामान मिळून सुमारे 18 लाख 15 हजार रुपये किमंतीचा ऐवज लंपास केला. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.