18 जुलै रोजी संचालक मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीत मागील दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) नागरी सेवेतील प्रशासकीय अधिकारी पराग नगर्सेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल शुक्रवारी सायंकाळी त्यांनी पदाचा ताबा घेतला.
डेअरीवर नेमण्यात आलेल्या प्रशासकीय समितीचे ओएसडी म्हणून कार्यरत असलेले काशी नाईक यांनी 2 मे 2022 रोजी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. गोवा डेअरीच्या चर्चित आमसभेत एमडीची बेकायदेशीररित्या नियुक्तीच्या कारणावरून गदारोळ माजल्यानंतर काशी नाईक यांनी सन्मानाने या पदावरून पायउतार होत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. डेअरीचे कामकाज व्यवस्थितपणे पुढे नेण्यासाठी पुर्णवेळ एमडीची अंत्यत आवश्यकता होती. सद्या गोवा डेअरीवर नेमण्यात आलेली प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आगुस्तिनो मिष्कीता यांच्याकडे एमडीपदाचा तात्पुरता ताबा होता.
18 जुलै रोजी गोवा डेअरीचा अध्यक्ष ठरणार
गोवा डेअरीवर राजेश फळदेसाई यांचे पॅनल निवडून आलेले आहे. येत्या सोमवारी 18 जुलै रोजी संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. प्रशासकीय समिती बरखास्त केल्यानंतर संचालक मंडळाच्या कार्यकाळाला सुरूवात होणार आहे. तब्बल दोन अडीच वर्षानंतर गोवा डेअरीची सुत्रे संचालक मंडळाकडे जाणार आहे. नवविर्वाचित अध्यक्षाच्या निवडीनंतर पुढील कार्यवाही ठरणार आहे.
गोवा डेअरीसाठी कायमस्वरूपी व्यवस्थापकीय संचालकाच्या नेमणूकीसाठी प्रक्रिया सुरू झालेली होती. देशभरातून एकूण 80 अर्ज आलेही होते, त्यापैकी केवळ 10 जण या पदासाठी पात्र होते. गोव्यातील एकही अधिकारी, वेटरनरी डॉक्टर व्यवस्थापकीय संचालक पदासाठी घालून दिलेल्या अटीत बसत नसल्याचे आढळून आले होते. तरी काही इच्छुकांमध्ये यादीत समाविष्ट असलेल्याना आपली वर्णी गोवा डेअरीत एमडी पदी लागणार अशी चिन्हे दिसत असताना प्रशासकीय अधिकारी पराग नगर्सेकर यांच्या नियुक्तीमुळे सद्या या चर्चेला पुर्णविराम मिळालेला आहे.