दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे जी बऱ्याच जणांना अजिबात आवडत नाही. पण ती खाणेही तेवढेच जरुरी आहे. ह्रदयासाठी दुधी भोपळा अत्यंत चांगले औषध आहे. बऱ्याच वेळेला सांबारातही दुधी भोपळा घातला जातो.चवीला थोडा गोडसर असा हा भोपळा पचनास अत्यंत हलका आहे. पण जर तुम्हाला दुधीभोपळ्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यापासून बनवलेला खमंग पराठाही ट्राय करू शकता.
साहित्य
२ वाटी गव्हाचे पीठ
२चमचे बेसन पीठ
१ मध्यम आकाराचा कोवळा दुधी भोपळा
४ ते ५ हिरव्या मिरच्या
५ ते ६ लसूणपाकळ्या
१ छोटासा आल्याचा तुकडा
१ चमचा धणेजीरे पूड
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा हळद
१ चमचा तिखट
कोथिंबीर
तेल
कृती
प्रथम दुधी भोपळ्याची साले काढावीत.यानंतर दुधी भोपळा किसून घ्यावा.आलं,मिरची,कोथिंबीर, लसूण याची मिक्सरवर पेस्ट करावी.एका परातीत सर्व घटक घ्यावे.पराठ्यासाठी लागणारे पीठ दुधी भोपळ्यातील असलेल्या पाण्यातच भिजवून घ्यावे.यासाठी वरून पाणी घालायची आवश्यकता नाही.पीठही घट्ट भिजवावे.म्हणजे पराठे लाटता येतात.पराठे पोळपाटावर थोड्याश्या पीठावर लाटावेत.भाजताना दोन्ही बाजूंनी तेल सोडावे व भाजावेत.मऊ लुसलुशीत पराठे तयार आहेत.चटणी,सॉस,दही,लोणी याबरोबर गरमागरम पराठे सर्व्ह करा.