पुणे / वार्ताहर :
धोंडे जेवण एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. चोरटय़ांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून 30 तोळे सोन्याचे दागिने, चांदी आणि 25 हजार रुपयांची रोख रक्कम असा 14 लाख 58 हजार रुपयांचां मुद्देमाल लंपास केला आहे. संदेश सोसायटी सरस्वती बंगला मार्केटयार्ड परिसरात ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
याप्रकरणी माहेन गाडगीळ (वय 67) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरटय़ांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गाडगीळ हे व्यावसायिक आहेत. पूर्वी त्यांचा दुधाचा व्यवसाय होता. गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी असे दोघेजण बंगल्यात राहतात. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता ते सोमवारपेठेतील आपल्या नातेवाईकांच्या घरी धोंडे जेवणासाठी गेले होते. त्यामुळे बंगला बंद होता. याच संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. रोकड, सोने-चांदीचे दागिने असा 14 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पळून गेले. दरम्यान रात्री अकरा वाजताच्या सुमारास गाडगीळ दाम्पत्य घरी परतले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी आत जावून पाहिले असता, घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मार्केटयार्ड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून गुन्हा दाखल केला आहे. चोरटय़ांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस कांबळे करीत आहेत.