ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्याचा दौरा केला अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तडकाफडकी दिल्लीला गेले. त्यामुळे अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही प्रत्येक बुथवर पक्षप्रवेश घेत आहोत. ज्यांना भाजपची विचारधारा मान्य असेल, त्यांना आम्ही पक्षात प्रवेश देतो. पक्षाच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आलं तरी हरकत नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश देव धर्माला मानणारे आले तर त्यांचे स्वागतच आहे. अजित पवार यांच्याबद्दल मला माहिती नाही. मी प्रशासकीय कामासाठी दिल्लीला आलो आहे. कोणत्याही राजकीय कामासाठी आलेलो नाही. राजकारणात अनेक चर्चा होत असतात. पण सगळ्याच चर्चांमध्ये तथ्य नसते. हा महिना आमचा पक्षप्रवेशाचा आहे. त्यामुळे आम्ही राज्यभर दौरे करत आहोत.
अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द
अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरलेला होता. मात्र, हा दौरा त्यांनी अचानक रद्द केला. ते मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी असल्याचे समजते. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. हे दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते.