पंजाबचा 8 गड्यांनी पराभव, त्रिपाठीचे नाबाद अर्धशतक, मयांक मार्कंडेचे 4 बळी, धवनची खेळी वाया
वृत्तसंस्था/ हैदराबाद
2023 च्या टाटा आयपीएल टी-20 चषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात राहुल त्रिपाठीच्या नाबाद 74 धावांच्या खेळीच्या जोरावर सनराजर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 17 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार धवन याची नाबाद 99 धावांची खेळी वाया गेली. सनरायजर्स हैदराबादने या स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले.
कर्णधार शिखर धवनच्या नाबाद 99 धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 20 षटकात 9 बाद 143 धावा जमवल्या. धवनने 66 चेंडूत 5 षटकार आणि 12 चौकारासह नाबाद 99 धावा झळकवल्या. हैदराबादच्या मयांक मार्कंडेने 15 धावात 4 गडी बाद केले. त्यानंतर सनरायजर्स हैदराबादने 17.1 षटकात 2 बाद 145 धावा जमवल्या.
या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला फलंदाजीचे निमंत्रण दिले. डावातील पहिल्या चेंडूपासून पंजाबच्या डावाला गळती सुरू झाली. भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच चेंडूवर प्रभसिमरन सिंगला पायचित केले. त्यानंतर जेनसेनने मॅथ्यू शॉर्टला एका धावेवर पायचित केले. जान्सेनने पंजाबला आणखी एक धक्का देताना जितेश शर्माला 4 धावावर मार्करमकरवी झेलबाद केले. कर्णधार धवनला सॅम करन आणि मोहित राठी यांची साथ मिळाली. करण आणि धवन या जोडीने चौथ्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. मार्कंडेने करणला झेलबाद केले. त्याने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 22 धावा जमवल्या. उमरान मलिकने सिकंदर रझाला 5 धावावर बाद केले. पंजाबची 9.5 षटकात स्थिती 5 बाद 69 अशी होती. त्यानंतर पंजाबचे चार फलंदाज 19 धावात तंबूत परतले. मार्कंडेने पंजाबची तळाची फळी झटपट गुंडाळली. मार्कंडेने शाहरुख खानला 4 धावावर पायचित केले. उमरान मलिकने ब्रारला एका धावेवर त्रिफळाचित केले. मार्कंडेने राहुल चहर आणि नाथन इलिस यांना खाते उघडण्यापूर्वीच बाद केले. 15 व्या षटकात पंजाबने 9 बाद 88 धावा जमवल्या होत्या. शिखर धवन आणि मोहित राठी या शेवटच्या जोडीने अभेद्य 55 धावांची भागीदारी 5 षटकामध्ये केल्याने पंजाबला 143 धावापर्यंत मजल मारता आली. कर्णधार धवन शेवटच्या षटकात आपले शतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण त्याने या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचल्याने तो 99 धावावर पोहोचला आणि त्याचे शतक केवळ एका धावेने हुकले. मोहित राठीने नाबाद एक धाव जमवली. अवांतर 6 धावा नोंदवल्या गेल्या. पंजाबच्या डावात केवळ दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली तर त्यांच्या तीन फलंदाजांना खाते उघडता आले नाही. पंजाबच्या डावात 6 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले. मार्कंडेने 15 धावात 4, उमरान मलिकने 32 धावात 2, जान्सेनने 16 धावात 2 तर भुवनेश्वरकुमारने 33 धावात 1 गडी बाद केला.
त्रिपाठी-मार्करमची अभेद्य शतकी भागीदारी
हैदराबाद संघाच्या डावाला ब्रुक आणि अगरवाल यांनी सावध सुरुवात करून देताना 23 चेंडूत 27 धावांची भागीदारी केली. पंजाबच्या अर्शदीप सिंगने ब्रुकचा त्रिफळा उडवला. त्याने 14 चेंडूत 3 चौकारासह 13 धावा जमवल्या. डावातील 9 व्या षटकात सलामीचा अगरवाल तंबूत परतला. चहरने त्याला करनकरवी झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 3 चौकारासह 21 धावा जमवल्या. हैदराबाद संघाची यावेळी स्थिती 8.3 षटकात 2 बाद 45 अशी होती.
राहुल त्रिपाठी आणि कर्णधार मार्करम यांनी दमदार फलंदाजी करत तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य शतकी (100) भागीदारी केली. त्रिपाठीने 48 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारासह नाबाद 74 तर मार्करमने 21 चेंडूत 6 चौकारासह नाबाद 37 धावा झोडपल्या. डावातील 17 व्या षटकात मार्करमने 4 चौकार ठोकत संघाला विजयाच्या समीप नेले. त्यानंतर 18 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्रिपाठीने विजयी चौकार नोंदवून पंजाबचे आव्हान संपुष्टात आणले. हैदराबादच्या डावामध्ये 3 षटकार आणि 22 चौकार नोंदवले गेले. पंजाबतर्फे अर्शदीप सिंग आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : किंग्ज इलेव्हन पंजाब 20 षटकात 9 बाद 143 (शिखर धवन नाबाद 99, सॅम करन 22, राठी नाबाद 1, मार्कंडे 4-15, जान्सेन 2-16, उमरान मलिक 2-32, भुवनेश्वरकुमार 1-33).
सनरायजर्स हैदराबाद 17.1 षटकात 2 बाद 145 (ब्रुक 13, मयांक अगरवाल 21, राहुल त्रिपाठी नाबाद 74, अॅडेन मार्करम नाबाद 37, अवांतर 0, अर्शदीप संग 1-20, राहुल चहर 1-28).