77 टक्के पालकांचे मत, केवळ गणित-विज्ञानाच्या शिक्षणावर भर नको
भारतातील पालक त्यांच्या मुलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग, गणिताचे नवनवे ज्ञान प्राप्त करावे अशी इच्छा बाळगून असतात. परंतु अमेरिकेत 2 हजार पालकांवर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात 77 टक्के जणांनी प्राथमिक शिक्षणादरम्यान शैक्षणिक कौशल्यासोबत व्यक्तिमत्त्व विकासाचेही शिक्षण देण्यात यावे असे म्हटले आहे.
प्रामाणिक, न्यायप्रिय
मुलांनी शिक्षणासह संबंध अन् सामाजिकतेबद्दल जाणून घ्यावे असे 77 टक्के आईवडिलांचे म्हणणे आहे. तर 75 टक्के पालकांनी मुलाने इतरांना मदत करण्याचे महत्त्व जाणून घ्यावे असे मत व्यक्त केले आहे. आपल्या मुलामुलींनी शाळेत जबाबदारी, मदत, प्रामाणिकपणा, न्यायप्रिय होणे शिकावे अशी आईवडिलांची इच्छा आहे. व्यक्तिमत्त्व विकासाचे शिक्षण मुलांना शाळेत शिकविले जावे असे मतही पालकांनी व्यक्त केले आहे.
योग्य शिक्षणसंस्थेची निवड
75 टक्के पालकांनी मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी अशा शिक्षण संस्थेची निवड केली, जेथे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष लक्ष देण्यात येते. अशाप्रकारचे शिक्षण प्रारंभापासून मुलांना मिळाल्यास हे जग जगण्यासाठी उत्तम ठिकाण ठरणार असे मत पालकांनी व्यक्त केले आहे. शाळेतूनच याकरता प्रयत्न व्हायला हवेत. आमच्या मुलांना इतर मुलांचे सांत्वन करताना, खेळणी वाटताना किंवा संभाषण सुरू करताना पाहिल्यावर मुलांचा योग्यप्रकारे व्यक्तिमत्त्व विकास होत असल्याचे वाटले असे पालकांनी म्हटले आहे.
वर्गाबाहेरील शिक्षण
सर्वेक्षणात सामील तीन-चतुर्थांश पालकांनी मुलांसाठी अनेकदा वर्गाबाहेर शिकण्याच्या उत्तम संधी उपलब्ध होतात असे म्हटले आहे. आपली मुले समाजसेवेसाठी परिपक्व झाल्याचे 52 टक्के पालकांचे म्हणणे आहे. सामाजिक सेवेसाठी मुलांसोबत स्वतःही जाण्याची इच्छा असल्याचे बहुतांश पालकांनी नमूद केले आहे.