स्वराज्य क्रिकेट क्लब आयोजित फार्मा चषक क्रिकेट स्पर्धा : अश्विन कृष्णोजी मालिकावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
स्वराज्य क्रिकेट क्लब आयोजित फार्मा चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शितल संघाने संतोष संघाचा 6 गडय़ांनी पराभव करुन फार्मा चषक पटकाविला. अश्विनी कृष्णोजी याला मालिकावीराने गौरविण्यात आले.
होनगा येथील फिनीक्स स्कूल मैदानावर आयोजित फार्मा चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संतोष संघाने 10 षटकात 5 बाद 79 धावा केल्या. तिरुपती डोणगेकरने 3 चौकारासह 21, यल्लाप्पा नाईकने 3 चौकारासह 25 धावा केल्या.
शितलतर्फे जितेन पाटील, विश्वनाथ सोगली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शितल संघाने 9 षटकात 4 बाद 80 धावा करुन सामना सहा गडय़ांनी जिंकला. अश्विन कृष्णोजीने 3 षटकार, 2 चौकारासह 40 तर विनय हिरेमठने 11 धावा केल्या.
बक्षीस वितरण
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते श्रीधर चौगुले, मालुताई चौगुले, हरिश्चंद्र चौगुले, अजय असुकर, विनायक पाटील, सुनील पाटील, रमेश हंजी, अमित हंचीकट्टी, भरत कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज यल्लाप्पा नाईक, उत्कृष्ट गोलंदाज तिरुपती डोणगेकर, मालिकावीर अश्विन कृष्णोजी यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून महांतेश गवी, सुनील देसाई यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वराज्य स्पोर्ट्सच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.