पंतप्रधान किशिदा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जपान दौऱयावर रवाना झाले. जपानमधील नारा शहरात 8 जुलै रोजी प्रचारावेळी शिंजो आबे यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आल्यानंतर भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला होता. आता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर मोदी जपानी पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहेत. या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्दय़ांवर द्वयींमध्ये चर्चा अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी टोकियोला रवाना झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारांना दिली. तसेच जपानला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. ‘माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मी टोकियोला जात आहे’ असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी शिंजो आबे यांना प्रिय मित्र आणि भारत-जपान मैत्रीचा मोठा समर्थक म्हटले आहे. सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी जपानचे पंतप्रधान किशिदा आणि श्रीमती आबे यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील पंतप्रधान मोदींनी दिली आहे. शिंजो आबे यांच्या संकल्पनेनुसार भारत-जपान संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही काम करत राहू, असेही ते पुढे म्हणाले.