द्विपक्षीय करारांसह प्रादेशिक मुद्यांवर चर्चा अपेक्षित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर असणार आहेत. 21 आणि 22 मार्च रोजी पंतप्रधान भूतानला भेट देणार आहेत. या दौऱ्यामध्ये द्विपक्षीय करार आणि दोन्ही देशांमधील परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक बाबींवर चर्चा केली जाईल, असे पंतप्रधान मोदींच्या भूतानच्या दौऱ्याची माहिती शेअर करताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले. भारत आणि भूतान यांच्यात परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि सद्भावनेवर आधारित अनोखी आणि टिकाऊ भागिदारी आहे. आता या नव्या दौऱ्यामुळे द्विपक्षीय भागिदारी वाढवण्याच्या आणि गतिमान करण्याच्या मार्गांवर चर्चा होणार असल्याचेही सांगण्यात आले.
भूतान दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी भूतानचे विद्यमान राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंगे वांगचुक यांची भेट घेतील. तसेच भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्याशीही ते चर्चा करतील. भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे 14 ते 18 मार्च या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर होते. जानेवारी 2024 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर तोबगे यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. या भेटीदरम्यान भूतानच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भूतानच्या राजाच्या वतीने पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान मोदींना भूतान भेटीचे निमंत्रण दिले होते.