वृत्तसंस्था/ वॉरसॉ
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या पोलंड खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना रुमानियाच्या गॅब्रिएला लीचा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या एकेरीच्या सामन्यात टॉप सिडेड स्वायटेकने लीचा 6-3, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. क्लेकोर्टवरील स्पर्धेतील स्वायटेकने अलीकडच्या कालावधीत सलग 18 सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. स्वायटेकचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया बरोबर होणार आहे. फ्रान्सच्या गार्सियाने इटलीच्या कोकीऍरेटोचा 6-3, 7-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. युक्रेनच्या कॅटरिना बेंडलने इटलीच्या सारा इराणीचा 6-2, 3-0 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. दुखापतीमुळे इराणीने हा सामना अर्धवट सोडला