पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त, अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद
कोल्हापूर : उत्तूर तालुका आजरा येथे उत्तूर गारगोटी मार्गावर मारूती लक्ष्मण गुरव राहणार महालक्ष्मी मंदिराजवळ यांच्या हॉटेल व घराच्या पहिल्या ममजल्यावर जुगार अड्डा सुरु असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार गुरूवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदर जागी छापा टाकला असता यावेळी रोख रकमेसह ८ लाख ६६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सदर ठिकाणी जुगार खेळला जात होता. याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे व त्यांच्या पथकाने सापळा रचून सदर अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी रोख रक्कम आणि जुगार खेळणारे अकरा जण आढळून आले.
यामध्ये अड्डाचालक मारुती हनुमंत हत्तरगी (रा. उत्तूर ता. आजरा), घरमालक मारूती लक्ष्मण गुरव (रा. महालक्ष्मी मंदिर जवळ, उत्तूर ता. आजरा) याच्यासह ११ जणावर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संबंधितांकडून रोख रकमेसह दोन मोबाइल, चारचाकी गाडी, दोन मोटरसायकली इत्यादी साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे.