देशात डेअरी उद्योगात दबदबा असणाऱ्या अमूल या ब्रॅंडने केलेल्या एका ट्विटने कर्नाटकातील राजकारण तापले आहे. चार दिवसांपूर्वी अमूलने एक ट्विट केले होते, ज्यामध्ये अमूल बेंगळूरमध्ये ऑनलाइन वितरण सुरू करणार असल्याचे म्हटले होते. पण अमूलचे या ट्विटमुळे कर्नाटकात त्यांच्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या ट्विटनंतर कर्नाटकात सोशल मीडियावर #GoBackAmul नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे. येत्या 10 मे ला विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या कर्नाटक राज्यामध्य़े या प्रकरणामुळे वातावरण तापू लागले आहे. यामध्ये राजकिय नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या आहेत.
5 एप्रिल रोजी अमूलने बंगळूरमध्ये दही आणि दूध यासारख्या उत्पादनांचा पुरवठा करणार असल्याचे ट्विटद्वारे जाहीर केले. अमूलच्या या घोषणेनंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गुजरातमधील अमूल कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकार कर्नाटक मिल्क फेडरेशनचा ‘नंदिनी’ हा स्थानिक ब्रँड संपवत असल्याचा आरोप केला आहे. कॉंग्रेसच्या या आरोपामुळे कर्नाटकात अमूलच्या विरोधातही लोकांमध्ये रोष वाढत आहे.
कॉंग्रेसकडून कर्नाटक दूध महासंघ आणि अमूल यांच्यात विलीनीकरण होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत. या विलिनी करणानंतर भाजपला कर्नाटकमध्ये स्वतःच्या दुधाचा ब्रँड हवा आहे असा आरोप जेडीएस आणि काँग्रेसने केला आहे. भाजप कर्नाटकातील मिल्क सेक्टर उद्ध्वस्त करत असल्याचा आरोपही कॉग्रेसने केला. तर याविरूद्ध कर्नाटकातील नागरिकांना एकत्र येऊन लढा दिला पाहीजे यासाठी जेडीसकडून आंदोलनाच्या तयारित आहे.
त्यातच बेंगळूर हॉटेल्स असोसिएशनने आपल्या व्यवसायामध्ये अमूलच्या उत्पादनांना नाकारून कर्नाटकातील स्थानिक ब्रॅंड असलेल्या ‘नंदिनी’चे उत्पादन वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर कोणतेही राजकारण करू नये, असे आवाहन करून या माध्यमातून कॉंग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच येत्या काळात नंदिनी हा देशातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड बनेल. कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी भाजप सरकारच्या मदतीने नंदिनी ब्रँड अधिक मजबूत झाला आहे असून कर्नाटकातील 18 डेअरी ब्रँडपैकी एक भक्कम ब्रॅंड असल्याचे स्पष्टीकरण दिले.