उमेश पाल हत्याप्रकरण ः सध्या साबरमती तुरुंगात कैद
वृत्तसंस्था / प्रयागराज
बसप आमदार राजू पाल हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात गुन्हा नोंद झाल्यावर गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती तुरुंगात कैद बाहुबली माजी खासदार अतीक अहमदला प्रयागराज येथे आणण्याची तयारी सुरू आहे. प्रयागराज पोलीस आता अतीकला प्रयागराज येथे आणण्यासाठी न्यायालयाकडे वॉरंट जारी मागणी करणार असल्याचे समजते. या वॉरंटच्या आधारावर गुजरात तुरुंगातून अतीक अहमदला उत्तरप्रदेशात आणून चौकशी केली जाऊ शकते.
याचबरोबर अन्य आरोपी आणि अतीक अहमदचा भाऊ तसेच माजी आमदार खालिद अजीम उर्फ अशरफला देखील बरेली तुरुंगातून प्रयागराज येथे आणले जाऊ शकते. प्रयागराज येथे आणल्यावर पोलीस दोन्ही आरोपींची कोठडी मिळवून उमेश पाल हत्याप्रकरणी चौकशी करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरच अतीक अहमदला गुजरातच्या साबरमती तुरुंगात ठेवण्यात आले आहे, याचमुळे उत्तरप्रदेश पोलिसांना अतीकची 14 दिवसांपर्यंत कोठडी मिळू शकते, त्यानंतर अतीकला गुजरात तुरुंगात पुन्हा पाठवावे लागणार आहे.
प्रयागराज पोलिसांना अतीकला उत्तरप्रदेशातील एखाद्या तुरुंगात ठेवायचे असल्यास सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी लागणार आहे. अतीक अन् अशरफ यांना प्रयागराज येथे आणण्याच्या चर्चेदरम्यान त्याच्या कुटुंबीयांना चकमकीची भीती सतावत आहे. अतीकची बहिण आयशा नूरी आणि अशरफची पत्नी जैनब फातिमाने पत्रकार परिषद घेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आरोपींना प्रयागराज येथे न आणण्याची विनंती केली आहे. एसटीएफ अतीक अन् अशरफ यांची चकमकीत हत्या करू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.