महापालिकेच्या यापूर्वी लिलाव झालेल्या 31 गाळय़ांसह न्यायप्रविष्ट 43 गाळे वगळले
प्रतिनिधी /बेळगाव
न्यायप्रविष्ट गाळे वगळून अन्य गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करून त्याची माहिती धारवाड उच्च न्यायालयात सादर करण्याची सूचना न्यायालयाने बजावली आहे. त्यानुसार महानगरपालिकेतर्फे न्यायप्रविष्ट गाळय़ांची यादी तयार करण्याचे काम बुधवारी हाती घेण्यात आले. उच्च न्यायालयात 17 आणि स्थानिक न्यायालयात 26 गाळेधारकांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे 43 गाळे वगळून अन्य गाळय़ांची यादी तयार करण्यात आली.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या 267 गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपल्याने नव्याने लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र पूर्वसूचना न देताच महापालिकेने लिलाव प्रक्रिया आयोजित केली असल्याचा दावा करून 43 गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यापैकी 17 गाळेधारकांनी उच्च न्यायालयात आणि 26 गाळेधारकांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामुळे लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.
लिलावाची माहिती न्यायालयात सादर करावी
याप्रकरणी महापालिकेने न्यायालयात आपले म्हणणे मांडून लिलावासाठी परवानगीची मागणी केली होती. त्यामुळे न्यायप्रविष्ट गाळे वगळून अन्य गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच लिलाव प्रक्रियेची माहिती न्यायालयात सादर करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे कायदा सल्लागार ऍड. यु. डी. महांतशेट्टी आणि महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर यांनी बुधवारी महापालिकेच्या महसूल विभागात बसून न्यायप्रविष्ट असलेल्या गाळय़ांची यादी तयार केली. तसेच भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव करण्यात येणाऱया गाळय़ांची यादी तयार केली आहे.
यापूर्वी 31 गाळय़ांसाठी बोली लावली आहे. त्यामुळे 267 गाळय़ांपैकी 31 गाळे व न्यायप्रविष्ट असलेले 43 गाळे वगळून अन्य गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही यादी तयार झाल्यानंतर लिलावाची निविदा प्रक्रिया राबविणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.