आगामी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी : अनेक केंद्रीय नेत्यांचे राज्यात होणार मेळावे
प्रतिनिधी/ बेंगळूर
गुजरात निवडणुकीनंतर केंद्रातील भाजप नेत्यांचे लक्ष कर्नाटक निवडणुकीकडे लागले आहे. त्यानुसार डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पक्षाचे केंद्रीय नेते राज्याचा दौरा करून भाजपच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजक भानूप्रकाश आणि प्रधान कार्यदर्शी सिद्धराजू यांनी दिली. बेंगळुरातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात येणार असून बेळगाव येथील रयत मोर्चाच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शाह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चित्रदुर्ग येथे होणाऱ्या एससी मोर्चाच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. 12 जानेवारी रोजी उडुपी येथे भाजप युवा मोर्चाचा मेळावा होणार असून यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
बागलकोट जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी 15 डिसेंबर रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा येणार आहेत. याचबरोबर 18 डिसेंबर रोजी बेंगळूर येथे विविध समित्यांची परिषद होणार असून यावेळी राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष उपस्थित राहणार आहेत. या महिन्याच्या 21 आणि 22 तारखेला मुरुडेश्वर येथे राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, अशी माहितीही सिद्धराजू यांनी दिली.