क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची माहिती, सोमवारी दिली आकस्मिक भेट
क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी काल सोमवारी सकाळी फोंडा क्रीडा प्रकल्पवर आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. येथील कमतरतेविषयी माहिती घेऊन हा प्रकल्प सुसज्ज होण्यासाठी आवश्यक त्या सूचना क्रीडा अधिकाऱयांना दिल्या. आवश्यक असलेल्या सुविधांची यादी काढण्यात सांगून आपणास पाठविण्याचे आदेश दिले. फोंडा क्रीडा प्रकल्प सुसज्ज होण्यासाठी आपले प्राधान्य राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्यासोबत सागचे अभियंता दीपक लोटलीकर, टीएसओ प्रकाश सतरकर, क्रीडा प्रशिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गैरहजर असलेले प्रशिक्षक व कर्मचाऱयांची त्यांनी दखल घेतली. स्वीमींगपूलवर जाऊन मंत्री गोविंद गावडे यांनी पाहणी करुन फिल्ट्रेशन व इतर तांत्रिक बाबींविषयी माहिती घेतली. देखभाल करण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या तातडीने उपलब्ध करण्यास सांगितले. फ्लोअरींग बदलण्यासाठी तसेच प्रेक्षक गॅलरीत कबुतरांमुळे होणाऱया अस्वच्छतेकडे लक्ष देण्यास सांगितले.
मैदानावरील भंगार हटविण्याचे आदेश
खुल्या मैदानावर असलेले लोखंडी भंगार आठवडय़ाभरात काढुन नेण्याचे त्यांनी आदेश दिले. हा भंगार खेळाडूंना त्रासदायक असून अपघातही होऊ शकतात. क्रिकेट प्रशिक्षणार्थ्यांना सुविधा व ग्राऊंड्समॅन पुरविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रसाधनगृह अस्वच्छ असून तेथे काहीच सुविधा नाही. ते वापरण्यायोग्य करावे असे त्यांनी आदेश दिले.
जिम सुसज्ज करण्याचे संकेत
जिममध्ये सर्व सामुग्री गंजलेल्या स्थितीत आहेत, व्यायाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नवीन सामुग्रीची यादी करण्यास त्यांनी सांगितले आहे. हा जिम वातानुकूलीत करण्यासाठी तसेच रंगरंगोटी करण्यासाठी सूचना दिल्या. प्रवेशद्वारा जवळच असलेले बिनवापराचे सामान हटविण्यास सांगितले.
पाहणी करीत असताना क्रीडामंत्र्यांनी जलतरण, क्रिकेट, तायक्वांदो, ऍथलेटिक्स व इतर प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे काय याविषयी थेट प्रश्न केले. नियमित सराव करा, मेहनत घ्या व उच्च कामगिरी करुन गोव्याला नावलौकीक मिळवून शान वाढवा असे आवाहन त्यांनी या प्रशिक्षणार्थ्यांना केले.