गोल्डन ज्युबिली, शास्त्री मॉल, पालीका बाजार जीसुडामार्फत : भटक्या गुरांसाठी निवारा, पेन व कॅन्टर वाहनाची खरेदी
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा पालीकेचा सन 2011 सालापासून आजपर्यंत रूपये 2.20 कोटी खर्चुन अपुर्णावस्थेत असलेला गोल्डन ज्युबली प्रकल्प अखेर जीसुडाकडे सोपविण्यात येत असल्याचा महत्वाचा निर्णय फोंडा पालीकेच्या काल सोमवारी झालेल्या पालीका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालीकेचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांनी दिली.
त्यामुळे जीसुडा व पालीका प्रधिकारणाच्या सहकार्याने फोंडा शहरातील रखडलेले सर्व प्रकल्प मार्गी लागणार असून त्यात अन्य प्रकल्पाची भर घालून फोंडा पालीका क्षेत्राचा कायापालट करण्याचा निर्धार फोंडा पालीकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी केला आहे. फोंडा शहराच्या मध्यमागी पोलीस स्थानकाच्या मागे असलेल्या ‘शास्त्री मॉल’ प्रकल्पालाही चालना मिळणार आहे. ‘इंन्टीग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ म्युनिसीपल टाऊन’ या योजनेअंतर्गत सुसज्ज शास्त्री मॉल उभारण्यात येणार आहे. सद्यपरिस्थीती एका बाजूने वाकलेली इमारत 50 वर्षे जुनी असून अंत्यत धोकादायक स्थितीत आहे. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमने या इमारतीच्या धोक्याविषयी अहवाल सन 2016 साली सादर करण्यात आला होता. येथील चार दुकानदारांना इतरस्त्र स्थलांतरीक करण्याबाबत बोलणी झालेली आहे. तसेच इमारतीच्या खाली तळमजल्यावर पार्किगसाठी सोय करण्यात येणार आहे.
जुने मासळी बाजार येथे सुसज्ज पालीका बाजार प्रकल्प
जुने मासळी बाजार तोडून त्याजागी नवीन पालीका बाजारासाठी नियोजन करण्यात येणार आहे. फोंडा पालीकेकडे सद्यपरिस्थितीत मलनिस्सारणासाठी फक्त एकच वाहन असल्यामुळे या गैरसोयीवर मात करण्यासाठी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत दहा हजार लिटर क्षमतेची ‘नाईट सॉईल कॅन्टर’ हे वाहन पालीकेच्या वाहनाच्या ताफ्यात भर पडणार आहे. तसेच आपत्कालीन स्थितीत वादळ वाऱयात झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्यानंतर त्वरीत हटविण्यासाठी क्रेन वाहन विकत घेण्यात येणार आहे. फोंडा शहराच्या मास्टर फ्लानसाठी जीसुडाअंतर्गत कन्सल्टनची नियुक्ती करण्यात येणार असून त्याअंतर्गत वॉकिंग ट्रेक, सुशोभित बागेचे नियोजन करण्यात येणार आहे.
भटक्या गुरे पकडण्यासाठी वाहन व गोशाळा
भटक्या गुरांबाबत फोंडा पालीका विचाराधीन असून निरंकाल येथे रूपये 18 लाख खर्चुन गोशाळेत शहरातील भटक्या गुरांची सोय करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील गुरे निरंकाल येथे नेण्यासाठी खास गुरे पकडण्याची सोय असलेले वाहन खरेदी करण्यात येणार आहे. भटकी गुरे नियोजन योजनाअंतर्गत जीसुडा व पालीका प्राधिकरणाच्या सहाय्याने प्रश्न सोडविण्याकडे कल राहणार आहे. याकामी नगर नियोजन मंत्री व स्थानिक आमदार तथा कृषि मंत्री रवी नाईक यांचेही महत्वाची मार्गदर्शन लाभल्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी नमूद केले. फेंडा मार्केट प्रकल्पाकडे जाण्यासाठी असलेली वाटेचा प्रश्न सोडण्याची सोय इमारतीत बांधणी कंत्राटदाराकडे बोलणी करून करण्याचे ठराव यावेळी घेण्यात आला.