वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाने ज्येष्ठ नेत्या प्रियांका कक्कर यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. शनिवारी झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सरचिटणीस डॉ. संदीप पाठक यांच्या हस्ते कक्कर यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छाही दिल्या.
प्रियांका कक्कर 2013 पासून ‘आप’शी संबंधित आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी सक्रियपणे पार पाडली आहे. त्यांनी तेलंगणा निरीक्षक, राघव चड्ढा यांच्या कालकाजी मतदारसंघातील प्रभारी म्हणून काम केले आहे. तसेच 2021-2023 पर्यंत राज्यसभा सदस्य संजय सिंह यांच्या सल्लागार म्हणूनही काम पाहिले. त्या उत्तर प्रदेशच्या कायदेशीर निरीक्षक होत्या आणि 12 सदस्यांच्या देखरेख समितीचाही भाग होत्या. प्रियांका कक्कर यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रियांका कक्कर यांच्या शिक्षणाला आणि कलागुणांना महत्त्व देत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.