पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची माहिती : तयारीची पाहणी
बेळगाव : सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी तयारीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रेल्वे, जल जीवन मिशन, कृषी आदीसंबंधी 2 हजार 250 कोटी रुपयांच्या विकासकामांना पंतप्रधानांच्या हस्ते चालना देण्यात येणार आहे, असे सांगितले. सरकारी विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना गोविंद कारजोळ पुढे म्हणाले, सुमारे 190 कोटी रुपये खर्चून नुतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वेस्थानकाचे उद्घाटन होणार आहे. कोट्यावधी रुपये खर्चातून निर्माण केलेला बेळगाव-लोंढा डबल रेल्वेमार्ग, 2 हजार कोटी रुपयांच्या जल जीवन मिशन योजनेच्या कामांना पंतप्रधान चालना देणार आहेत.
य् ााबरोबरच देशभरातील 8 कोटी शेतकऱ्यांना 16 हजार कोटी रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी जमा करण्याचाही कार्यक्रम होणार आहे. कोट्यावधी रुपये खर्चाच्या बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनेच्या कामालाही पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात करण्यात येणार असून रोड शो, विकासकामांना चालना आदी कार्यक्रम पंतप्रधान कार्यालयाने अंतिम बनविले आहेत. सीपीएड मैदानापासून चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, रेल्वेस्थानक, गोवावेसमार्गे 8 कि.मी. रोड शो करण्यासंबंधी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मात्र कोणत्या मार्गावर रोड शो करावा हे सुरक्षा दल ठरविणार आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, अॅड. एम. बी. जिरली, भाजप ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर आदी उपस्थित होते.