वृत्तसंस्था/ जकार्ता (इंडोनेशिया)
इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या दर्जामध्ये सुधारणा झाल्याची घोषणा शनिवारी विश्व बॅडमिंटन फेडरेशनने केली आहे. यापूर्वी ही स्पर्धा सुपर-500 म्हणून ओळखली जात होती. आता ही स्पर्धा सुपर-750 दर्जाची राहील, अशी माहिती फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये स्पर्धा कार्यक्रमांचा विस्तार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार आता 2023 ते 2026 या कालावधीत विश्व बॅडमिंटन फेडरेशन टूर कार्यक्रमामध्ये जादा चार स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. फेडरेशनच्या नव्या विश्व टूर बॅडमिंटन स्पर्धा कार्यक्रमांच्या यादीमध्ये आता एकूण 31 स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. वर्षभराच्या बॅडमिंटन हंगामाच्या अखेरीस विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या फायनल्समध्ये सुपर 1000, सुपर 750 आणि सुपर 500 या नव्या स्पर्धा खेळविल्या जातील. स्पर्धा कार्यक्रमाच्या विस्तारामुळे बॅडमिंटनपटूंना अधिक रोख बक्षिसे जिंकण्याची संधी निर्माण करून दिली आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये बॅडमिंटन या क्रीडाप्रकाराची झपाटय़ाने सुधारणा होत असून खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या संख्येमध्येही खूपच वाढ झाल्याचे दिसून येते.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विस्तारित स्पर्धा कार्यक्रमामध्ये मलेशिया खुल्या, अखिल इंग्लंड खुली, चीन खुली, इंडोनेशिया खुली या बॅडमिंटन टूरवरील सुपर 1000 दर्जाच्या स्पर्धा राहतील. त्यानंतर इंडिया खुल्या तसेच सिंगापूर खुल्या या स्पर्धा 750 दर्जाच्या म्हणून ओळखल्या जातील. सध्या चीन, डेन्मार्क, फ्रान्स आणि जपानमध्ये होणाऱया स्पर्धांचा दर्जा सुपर 750 आहे. त्यानंतर तीन नव्या सुपर 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धांचे यजमानपद ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिनलँड देशांतील शहरे भूषविणार आहेत. हाँगकाँग, चीन, इंडोनेशिया, कोरिया, मलेशिया, थायलंड आणि आता जपानमधील नवी स्पर्धा खेळविली जाईल.