म्हादई संबंधी ठराव संमत: घाऊक दारू विक्री दुकाना विरोधात ग्रामस्थ आक्रमक
वार्ताहर /दाभाळ
केंद्र सरकारने म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटक सरकारला दिलेला डिपीआर त्वरित मागे घेण्याचा ठराव घेतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई बाबत केलेल्या जाहीर विधानाचा बेतोडा निरंकाल ग्रामसभेत निषेध करण्यात आला. तसेच मणकटेमळ निरंकाल येथे नव्याने होऊ घातलेल्या घाऊक दारु विक्रीच्या दुकानाला पंचायतीने दिलेला ना हरकत दाखला त्वरित मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामसभेत करण्यात आली.
सरपंच उमेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली. गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटक राज्याला केंद्र सरकारने परवाना देऊन गोव्यावर अन्याय केलेला आहे. आपले राजकीय उद्दिष्ठ्या साध्य करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यासंदर्भात कर्नाटकची बाजू उचलून धरणारे जाहीर वक्तव्य निषेधार्ह असल्याची भुमिका ग्रामस्थांनी मांडली. म्हादईचे पाणी वळविण्यास विरोध करणारा ठराव संमत करून त्याची प्रत केंद्र सरकार व इतर संबंधितांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पंचायत क्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोतांचे आत्तापासूनच संवर्धन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.
मणकटेमळ निरंकाल येथे बिंदिया नाईक या स्थानिक महिलेला घाऊक दारु विक्रीचे दुकान सुरु करण्यास पंचायतीने दिलेला ना हरकत दाखला दिल्याने या मुद्यावरून जोरदार चर्चा झाली. ग्रामस्थांचा विरोध असतानाही दिलेला ना हरकत दाखला त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या दारु विक्री दुकानामुळे गावातील युवापिढी दारुच्या आहारी जाईल तसेच काही कुटुंबावरही त्याचा विपरीत परिणाम होईल. गावात भांडणतंटे होऊन सामाजिक दृष्ट्याही त्याचे अनेक दुष्परिणाम होतील असा मुद्दा ग्रामस्थांनी सभेसमोर मांडला. शेवटी या मुद्यावरून हात उंचावून मतदान घेण्यात आले व नागरिकांनी बहुमताने त्याला विरोध केल्यामुळे ना हरकत दाखला मागे घेण्याचा ठराव संमत करण्यात आला.
बेतोडा पंचायतीमध्ये यापूर्वी सचिव म्हणून कार्यरत असलेले संजय नाईक यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीचा कुठपर्यंत पाठपुरावा झाला असा प्रश्न उपस्थित करीत सरपंचांना धारेवर धरण्यात आले. तसेच या प्रकरणी लवकरात लवकर चौकशी होण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पंचायतीमध्ये नियुक्त केलेला स्वयंपूर्ण मित्र नागरिकांसाठी उपलब्ध होत नसल्याने त्याची बदली करावी व या जागेवर नवीन स्वयंपूर्ण मित्र नियुक्त करण्याची तरतूद करावी, पंचायतीवर विविध उपसमित्यांची निवड होऊनही अद्याप एकही बैठक या समित्यांकडून घेण्यात आलेली नाही. या समित्या केवळ कागदावर न राहत त्या कृतीशिल बनाव्या अशी मागणी करण्यात आली. कण्णेव्हाळ बेतोडा जंक्शनवर वाहतूक सर्कल उभारावे व सिग्नल कार्यान्वित करावे, पिण्यामळ व सातेरीमळ दरम्यान उ•ाणपूल उभारावा, कोनशे येथील मुख्य रस्त्यावरील धोकादायक वळणे कापून रस्ता वाहतूकीसाठी सुरक्षित करावा, भंगारअ•dयांवर कायदेशीर कारवाई करावी, भिण्णे बेतोडा येथे रस्त्याच्या बाजुला संरक्षक कठण उभारावा, निरंकाल ते बेतोडा दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व हॉटमिक्स डांबरीकरण करावे, खुरवळे येथील घरांना पाणी पुरवठ्याची तसेच पथदीपांची सोय करावी आदी मुद्दे चर्चेला आले.
सन् 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रु. 3 कोटी 51 लाख 90 हजारांच्या वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत बाबुसो गावकर, हेमंत सामंत, सदानंद बोणबागकर, प्रज्योत गावकर, प्रदीप गावकर, अंकुश गावकर, सर्वेश शिलकर, महेश सतरकर, सत्यवान गावकर, सत्यवान सालेलकर, प्रशांत मायणेकर, प्रशांत गावकर, नेहा वेळीप, आदी ग्रामस्थांनी भाग घेतला. उपसरपंच चित्रा सालेलकर, पंचसदस्य चंद्रकांत सामंत, मधू खांडेपारकर, अक्षय गावकर, दिनेश गावकर, दुर्गाप्रसाद वैद्य, विद्या गावकर व वैशाली सालेलकर हे उपस्थित होते. सचिव विनोद शेटकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. निरीक्षक म्हणून फोंडा गटविकास कार्यालयातील खुशबू कामत हेळेकर या उपस्थित होत्या. मधू खांडेपारकर यांनी आभार मानले.