पंजाब किंग्सचा चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध दणकेबाज विजय
मुंबई / वृत्तसंस्था
शिखर धवनचा 59 चेंडूतील 88 धावांचा झंझावात आणि ऋषी धवन-रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पंजाब किंग्सने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला धूळ चारली. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 187 धावांचा डोंगर रचल्यानंतर चेन्नईने आघाडी फळी कोसळल्यानंतरही जोरदार संघर्ष केला. मात्र, उत्तरार्धात त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. त्यांना 20 षटकात 6 बाद 176 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 188 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे पहिले 3 फलंदाज 40 धावांमध्येच बाद झाले. ऋतुराज गायकवाड 30 धावांवर बाद झाला तर अम्बाती रायुडूने सर्वाधिक 78 धावा फटकावल्या. शेवटच्या षटकात 27 धावांची आवश्यकता असताना धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईची निराशा होणे साहजिक होते.
धवनचे नाबाद अर्धशतक
तत्पूर्वी, सलामीवीर शिखर धवनने हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावल्यानंतर पंजाब किंग्सने 4 बाद 187 धावांचा डोंगर रचला. 36 वर्षीय डावखुऱया धवनने 88 धावांची नाबाद खेळी साकारत श्रीलंकन सहकारी भानुका राजपक्षसह (42) दुसऱया गडय़ासाठी 11.3 षटकात 110 धावांची भागीदारी दिली. प्रारंभी, कर्णधार मयांक अगरवाल स्वस्तात बाद झाला असला तरी केवळ या उभयतांच्या फटकेबाजीमुळे पंजाबला डाव सावरता आला.
धवनने 53 चेंडूतील नाबाद खेळीत 9 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली. त्याने यापूर्वी पुण्यात झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध लढतीत नाबाद 70 धावांचे योगदान दिले होते. पंजाबविरुद्ध धवनला राजपक्षची उत्तम साथ लाभली. त्याने 32 चेंडूंचा सामना करत 2 चौकार, 2 षटकारांसह 42 धावा फटकावल्या.
11.5 कोटी रुपयांना करारबद्ध इंग्लिशमन लियाम लिव्हिंगस्टोनने येथे 7 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह जलद 19 धावा फटकावल्या. कर्णधार मयांक अगरवाल या हंगामात अद्याप झगडत असून हीच मालिका या लढतीतही कायम राहिली. तो डावातील 6 व्या षटकात 21 चेंडूत 18 धावांवर बाद झाला. पंजाबने पॉवर प्लेच्या 6 षटकात 1 बाद 37 धावांपर्यंत मजल मारली होती.
धवन व राजपक्ष यांनी एकेरी-दुहेरी धावा घेत असताना खराब चेंडूंवर चौकार-षटकार वसूल करण्यावर भर दिला आणि डाव सावरल्यानंतर जोरदार फटकेबाजी सुरु केली. या जोडीने शेवटच्या 5 षटकात 64 धावांची आतषबाजी केली. राजपक्ष नंतर 18 व्या षटकात डेव्हॉन ब्रेव्होच्या (2-42) गोलंदाजीवर बाद झाला. ब्रेव्होने शेवटच्या षटकात लिव्हिंगस्टोनला देखील तंबूचा रस्ता दाखवला. जॉनी बेअरस्टो डावातील शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. महिश तिक्षणाने 32 धावात 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक ः पंजाब किंग्स ः 20 षटकात 4 बाद 187 (शिखर धवन 59 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 88, भानुका राजपक्ष 32 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 42, लियाम लिव्हिंगस्टोन 7 चेंडूत 19, मयांक अगरवाल 18. अवांतर 14. महिश तिक्षणा 1-32, डेव्हॉन ब्रेव्हो 4 षटकात 2-42).
चेन्नई सुपरकिंग्स ः 20 षटकात 6 बाद 176 (अम्बाती रायुडू 39 चेंडूत 7 चौकार, 6 षटकारांसह 78, ऋतुराज गायकवाड 27 चेंडूत 30. अवांतर 16. रबाडा 2-23, ऋषी धवन 2-39).
ऋषी धवनचा मास्क कशासाठी?
तब्बल 6 वर्षांनंतर आपला पहिला आयपीएल सामना खेळत असलेल्या ऋषी धवनने या लढतीत फेस मास्क परिधान करुन गोलंदाजी केली. वास्तविक, क्षेत्ररक्षण करताना खेळाडू फेस मास्क घालत नाहीत. मात्र, ऋषी धवन नाकाच्या दुखापतीतून सावरत असून या पार्श्वभूमीवर त्याने हा मास्क घातला होता.
शिखर धवन आयपीएलमध्ये 6 हजार धावा जमवणारा दुसरा फलंदाज
पंजाब किंग्सचा आघाडीवीर शिखर धवन सोमवारी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 6 हजार धावा जमवणारा दुसरा फलंदाज ठरला. वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध लढतीत त्याने हा माईलस्टोन सर केला. यापूर्वी आरसीबीच्या विराट कोहलीने असा पराक्रम गाजवला आहे.