नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय संरक्षण विभागाने पेगॅससचा प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱया सॉफ्टवेअरची खरेदी केली असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. हे सॉफ्टवेअरही पेगॅससप्रमाणे इस्रायलमध्येच निर्माण करण्यात आले आहे. संरक्षण विभागाने हे सॉफ्टवेअर आणि त्याचा उपयोग करण्यासंबंधीची उपकरणे खरेदी केली आहेत असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र, संरक्षण विभागाने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
या साधनांची खरेदी केवळ सेनादलांच्या उपयोगासाठी आणि शत्रूदेशांवर हेरगिरी करण्यासाठी केली जाते. तिचा उपयोग देशांतर्गत कामांसाठी केला जात नाही, असे स्पष्टीकरण तज्ञांनी दिले आहे. कॉग्निटे सॉफ्टवेअर लिमिटेड असे हे सॉफ्टवेअर निर्माण करणाऱया कंपनीचे नाव आहे. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार हे सॉफ्टवेअर भारतीय संरक्षण विभागाने खरेदी केले आहे. या सॉफ्टवेअरचा उपयोग पत्रकार, सरकारचे विरोधक, एकाधिकारशाही मानणाऱया सरकारांचे विरोधक, विरोधी पक्षनेते आणि त्यांची कुटुंबे, तसेच मानवाधिकार कार्यकर्ते यांच्याविरोधात जगभरात केला जातो, असा आरोप या वृत्तसंस्थेने केला. कोणच्याही नकळत हे सॉफ्टवेअर काम करते. ते कोणाच्याही स्मार्टफोनमध्ये घुसविले जाऊ शकते, आदी आरोप करण्यात आले आहेत. तीन वर्षांपासून भारतीय संरक्षण विभाग ही खरेदी करत आहे, असेही या वृत्तपत्राचे म्हणणे आहे. मात्र, याला कोणताही अधिकृत दुजोरा नाही.
कॉग्निटेचे मौन
कॉग्निटे कंपनीने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आम्ही आमच्या ग्राहकांची नावे उघड करु शकत नाही. त्यामुळे गुप्ततेचा भंग होऊ शकतो. हे सॉफ्टवेअर केवळ अधिकृत उपयोगासाठीच दिले जाते, असे कंपनीने अन्य काही ठिकाणी स्पष्ट केले आहे. पेगॅसस कंपनीच्या सॉफ्टवेअरसंबंधी याच वृत्तसंस्थेने केंद्रातील सरकारविरोधात आरोप केले होते. तसेच या वृत्तपत्रासह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीला काहीही न आढळल्याने याचिकाकर्त्यांचीच नाचक्की झाली होती. त्यामुळे आता हा नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.