देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुरुषोत्तम दत्तात्रेय मोरे हे ९ मतांनी विजयी झाले. पुढील दोन वर्षासाठी ते अध्यक्षपदी राहणार आहेत.
संस्थानचे विद्यमान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांची मुदत संपल्याने अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या रिंगणात दोनजण होते. पुरुषोत्तम महाराज मोरे यांना १६४ मते मिळाली तर उमेश सुरेश मोरे यांना १५५ मते मिळाली. तीन मते बाद झाली. त्यामुळे पुरुषोत्तममहाराज मोरे हे नऊ मतांनी विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश मोरे होते. भास्कर मोरे, शामकंत मोरे, सुजित मोरे सहायक अधिकारी होते.
संत तुकाराम महाराज संस्थानच्या गणेशबुवा, गोविंदबुवा आणि आबाजी बुवा अशा तीन शाखा आहेत. दर दोन वर्षांनी अध्यक्षपद निवडणूक होते. या वर्षी गणेश बुवा शाखेतील दोन उमेदवार होते. त्यापैकी पुरुषोत्तम मोरे हे निवडणुकीत विजयी झाले. सर्व शाखातील एकूण ३७२ मतदार होते. त्यापैकी ३२२ मतदारांनी मतदान केले.
पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले, वारकरी संप्रदायाचे कार्य सामान्य माणसांपर्यंत गेले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच इंद्रायणी नदी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संस्थानचे विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु राहील.