मॉस्को / वृत्तसंस्था
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात कारवाई सुरु असतानाच पूर्वी त्यांची भाषणे लिहिणारे अब्बास गॅलिमोव्ह यांना मोस्ट वाँटेंड म्हणून घोषित करण्यात आले आहे. गॅलिमोव्ह यांच्यावर रशियाचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रशियाच्या वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. रशियाच्या गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार त्यांचे नाव मोस्ट वाँटेडच्या सूचीत घालण्यात आले आहे. गॅलिमोव्ह यांनी कोणता कायदा तोडला आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, त्यांच्यावर रशियाच्या राष्ट्रीय धोरणावर टीका केल्याचा आरोप आहे. त्यांनी 2008 पासून 2012 पर्यंतच्या चार वर्षांमध्ये पुतीन यांची भाषणे लिहिण्याचे काम केले होते. गेली अनेक वर्षे ते रशियाच्या बाहेर आहेत. त्यांनी युक्रेन युद्धावरुन पुतीन यांच्यावर टीका केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
त्यांना पकडण्यासाठी रशियाची गुप्तहेर संस्था कार्यरत आहे. गेल्या महिन्यात त्यांना रशियाच्या गृहविभागाकडून विदेशी दलाल म्हणून घोषित करण्यात आले होते. ते रशियाच्या विरोधकांना जाऊन मिळाले असून आता त्यांनी रशियाची हानी करण्याची योजना आखली आहे. त्यांना रोखणे आवश्यक असून ते हाती लागल्यास त्यांना रशियात आणून त्यांच्यावर अभियोग चालविला जाईल, असे रशियाच्या गृहविभागाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यांचा शोध सुरु आहे.