नवी दिल्ली / वृत्तसंस्था
फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना तिसऱयांना अपत्यप्राप्ती झाली आहे. त्यांची पत्नी प्रिसिला चॉन यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. ही माहिती झुकरबर्ग यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. या कन्येचे नामकरण ओरिलिया असे करण्यात आले असल्याची माहितीही याच पोस्टवरुन समजत आहे. ओरिलिया हे झुकरबर्ग पती-पत्नीचे तिसरे अपत्य आहे. झुकरबर्ग यांची प्रथम कन्या 7 वर्षांची असून तिचे नाव मॅक्झिमा आहे. द्वितीय कन्येचे नाव ऑगस्ट असे असून ती 5 वर्षांची आहे.
झुकरबर्ग यांनी दोन पोस्ट केल्या असून दोन फोटो आहेत. एका छायाचित्रात ते आपल्या नवजात कन्येसह दाखविण्यात आले आहेत. दुसऱया छायाचित्रात नवजात कन्या तिच्या आईसह दिसत आहे. झुकरबर्ग आणि चॉन 2003 पासून एकत्र आहेत. दोघांची ओळख हार्वर्ड विद्यापीठात झाली होती. ते दोघेही 2003 पासून एकत्र रहात असले तरी त्यांचा विवाह मात्र, 2012 मध्ये झाला होता.