चेन्नई / वृत्तसंस्था
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपला राष्ट्रीय सहकारी विदित गुजरातीला हरवत मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर चेसेबल मास्टर्स 2022 ऑनलाईन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. आता उपांत्यपूर्व फेरीत 16 वर्षीय आर. प्रज्ञानंदची लढत चीनच्या वेई यी याच्याविरुद्ध होईल. या स्पर्धेच्या सहाव्या फेरीत कार्लसनला नमवत सनसनाटी निकाल नोंदवणाऱया प्रज्ञानंदच्या खात्यावर 25 गुण असून तो चौथ्या स्थानी विराजमान आहे.
16 ग्रँडमास्टर्सचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पी. हरिकृष्णा व गुजराती हे अन्य दोन भारतीय पहिल्या 8 मध्ये पोहोचू शकले नाहीत. हरिकृष्णा 18 गुणांसह नवव्या स्थानी तर गुजराती 17 गुणांसह 11 व्या स्थानी राहिले. अनिश गिरी-नेदरलँड्स (29 गुण), कार्लसन-नॉर्वे (28 गुण), डिंग लिरेन-चीन (25 गुण) गुणतालिकेत पहिल्या तीन स्थानी विराजमान आहेत.