शोधमोहीम थंडावली, यंत्रणा परतली : रेसकोर्स परिसरातील धास्ती कमी
प्रतिनिधी /बेळगाव
बिबटय़ाच्या दहशतीमुळे वनखाते आणि पोलीस खात्याच्या यंत्रणेने गजबजलेला रेसकोर्सचा परिसर तब्बल एक महिन्यानंतर शांत झाला आहे. शिवाय वनखात्यानेही रेसकोर्समधून बिबटय़ा निघून गेल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिसरातील धास्ती कमी झाली आहे. शेजारील क्लब रोडवर वाहनधारकांची वर्दळ वाढली आहे.
रविवारी वनखात्याने अखेरचे कोम्बिंग ऑपरेशन राबवून मोहीम गुंडाळली. दरम्यान मागील काही दिवसांपासून रेसकोर्स परिसरात असलेल्या हत्ती पथकालाही परत पाठविण्यात आले. शिवाय परिसरात केवळ 7 ते 8 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे रेसकोर्सचा परिसर शांत झाल्याचे पहायला मिळत आहे. 5 ऑगस्ट रोजी एकावर बिबटय़ाने हल्ला केला होता. तेव्हापासून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. शिवाय ट्रप कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे, मुधोळ कुत्री यासह कर्मचारी शोधमोहिमेत गुंतले होते. शिवाय तीनवेळा बिबटय़ा नजरेलादेखील पडला होता. त्यामुळे रेसकोर्सचा परिसर वनखात्याच्या यंत्रणेने गजबजला होता. मात्र आता शोधमोहीम थंडावल्याने परिसर शांत झाला आहे.
तब्बल महिनाभर विविध यंत्रणांच्या माध्यमातून रेसकोर्समध्ये शोधमोहीम सुरू होती. 300 कर्मचाऱयांच्या सहकार्याने अडीचशे एकर परिसर दोनवेळा पिंजून काढण्यात आला. त्यामुळे महिन्याभरात या ठिकाणी रात्रंदिवस कर्मचाऱयांची वर्दळ होती. आता शोधमोहीमदेखील थंडावली असून कर्मचारीही कमी करण्यात आले आहेत. केवळ ट्रप कॅमेरे आणि मोजके कर्मचारी या ठिकाणी तैनात केले आहेत.
बिबटय़ाला पकडण्यासाठी सारी यंत्रणा एकत्रित झाली होती. शिवाय बिबटय़ाला कोणत्याही परिस्थितीत पकडावेच लागेल, अशा भूमिकेत असलेल्या वनखात्याला अखेर अपयश आले. त्यामुळे यंत्रणेसाठी केलेला सारा खर्चदेखील पाण्यात गेला आहे. बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखात्याची आणि पोलीस खात्याची सारी यंत्रणा कामाला लागली होती. दरम्यान कर्मचारी रेसकोर्समध्ये तळ ठोकून होते. शिवाय बिबटय़ाच्या शोधासाठी फटाके व बॉम्ब वाजवून आवाज करण्यात आला. शिमोगा, दांडेली येथून प्रशिक्षक तज्ञ आणि वनकर्मचाऱयांचे पथक दाखल झाले होते. या साऱया शोधमोहिमेमुळे महिनाभर रेसकोर्सचा परिसर गजबजला होता. आता शोधमोहीम थंडावल्याने परिसरदेखील शांत झाला आहे.
रेसकोर्स मॉर्निंग वॉकर्ससाठी कधी खुले होणार?
दाट झाडी आणि जैवविविधता असलेल्या रेसकोर्सच्या परिसरात सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱयांची संख्या अधिक आहे. आबालवृद्धांसह फिरायला जाणाऱया नागरिकांची संख्या अधिक आहे. मात्र बिबटय़ाच्या दहशतीमुळे रेसकोर्सचे गेट बंद करून मॉर्निंग वॉकर्ससाठी रेसकोर्स बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता बिबटय़ा येथून निघून गेल्याचे वनखात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकर्ससाठी रेसकोर्सचा परिसर खुला करावा, अशी मागणी होत आहे.
ससे, रानमांजर, मोरांची संख्या झाली कमी
वनखात्याने शोधमोहीम गुंडाळल्यानंतर रेसकोर्सच्या मैदानात महिनाभर थांबलेल्या गोल्फ खेळाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान 20 ते 25 दिवस बिबटय़ाने या ठिकाणी आसरा घेतल्याने परिसरातील ससे, रानमांजर आणि मोरांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. या बिबटय़ामुळे परिसरातील इतर प्राण्यांना धोका पोहोचल्याचे समोर आले आहे.