वृत्तसंस्था/ दुबई (युएई)
नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या आयसीसी महिलांच्या टी-20 मानांकनात भारताच्या राधा यादव आणि पूजा वस्त्रकार यांना अधिक लाभ मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या भारत आणि लंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत राधा यादव आणि पूजा वस्त्रकार यांची कामगिरी दर्जेदार झाल्याने त्यांच्या मानांकनात सुधारणा झाली आहे.
भारत आणि लंका यांच्यातील टी-20 मालिकेत लंकेची कर्णधार चमारी अट्टापटूची कामगिरी दर्जेदार झाल्याने तिचे मानांकन एका अंकाने वधारले असून ती आता पाचव्या स्थानावर आहे. अट्टापटूने या मालिकेत 69.50 धावांच्या सरासरीने 139 धावा जमविताना अनुक्रमे 16, 43 आणि नाबाद 80 धावा झळकविल्या. भारताची सलामीची फलंदाज शफाली वर्माचे स्थान घसरले असून ती आता पाचव्या स्थानावर आहे. भारताची फिरकी गोलंदाज राधा यादवने या मालिकेत 19.50 धावांच्या सरासरीने 4 गडी बाद केल्याने ती गोलंदाजांच्या मानांकन यादीत 13 व्या स्थानावर आहे. लंकेची ओशादी रणसिंघेने 26 वे स्थान तर भारताच्या पूजा वस्त्रकारने 30 वे स्थान मिळविले आहे. भारतीय महिला संघाने ही मालिका 2-1 अशी जिंकली.