शिक्षेला स्थगिती देण्याची याचिकेद्वारे मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी आपल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केल्याची माहिती शनिवारी सूत्रांनी दिली. राहुल गांधी यांच्यापूर्वी त्यांच्याविरोधात खटला दाखल करणारे गुजरातमधील नेते पूर्णेश मोदी यांनीही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. मोदी आडनाव प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे राहुल यांना लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले होते.
गुजरात उच्च न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी यांनी याचिका दाखल करून गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंतीही राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. राहुल गांधींविरोधात बदनामीची तक्रार दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पॅव्हेट दाखल केले आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांनी आव्हान याचिका दाखल केल्यास आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही आदेश काढू नये, असे त्यांनी सुचविले आहे. मानहानीच्या प्रकरणात 23 मार्च 2023 रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, या निकालानंतर 27 मिनिटांनी त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 मार्चला राहुल गांधी यांना खासदारकीही गमवावी लागली होती. 7 जुलै रोजी गुजरात उच्च न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. या प्रकरणाव्यतिरिक्त राहुल यांच्यावर किमान 10 खटले प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत सुरत न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने दिले होते.