अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या निकटवर्तीयांवर बुधवारी ईडीने छापे टाकले आहेत. दिल्लीतील अबकारी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीची बनावट चौकशी पूर्ण देशासमोर आणल्यानेच माझ्या सहकाऱ्यांवर घरी छापे टाकण्यात आल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे.
संजय सिंह यांचे सहकारी अजीत त्यागी, सर्वेश मिश्रा यांच्या घरी ईडीने छापे टाकले आहेत. अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून तपास केला जात आहे. सीबीआयने याप्रकरणी 26 फेब्रुवारी रोजी सिसोदिया यांना अटक केली होती. तर ईडीने आरोपपत्रात सिसोदियांना घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार ठरविले आहे.
अबकारी घोटाळ्यात आम आदमी पक्षाचे आणखी काही मोठे नेते आणि बीआरएस नेत्या के. कविता, वायएसआर काँग्रेस खासदाराचा ‘साउथ ग्रूप’चा हात असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. ईडीने याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे.
सीबीआयने आरोपपत्रात सिसोदियांनाही आरोपी केले आहे. त्यांच्यासोबत उद्योजक विजय नायर देखील मुख्य आरोपी आहे. हैदराबाद येथील सीए बुच्ची बाबू गोरंटला, अर्जुन पांडे आणि अमनदीप सिंह ढल यांचेही नाव आरोपपत्रात सामील आहे. बुच्ची बाबू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांचे सीए आहेत. याप्रकरणी ईडीने कविता यांची चौकशी केली आहे.