ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करत आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा करण्यात येत आहे. याच दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार राजेश टोपे, सुनील भुसारा आणि चेतन तुपे यांनी रात्री उशिरा अजित पवारांची भेट घेतली. हे तिन्ही आमदार अजित पवारांच्या गळाला लागले असून, ते अजितदादांसोबत सत्तेत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
टोपे हे घनसावंगी मतदारसंघाचे आमदार आहेत. चेतन तुपे हे हडपसरचे तर सुनील भुसारा हे विक्रमगढचे आमदार आहेत. या तिन्ही आमदारांनी रात्री उशिरा मुंबईतील देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली. हे तिन्ही आमदार शरद पवार गटाच्या बैठकीलाही उपस्थित होते. मात्र, रात्री अचानक त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने ते अजितदादांसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार का, याकडे सगळय़ांच्या नजरा लागल्या आहेत.