कर्नाटकवर पहिल्यांदाच विजय, करण शर्मा, गर्ग यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ अलुर
युवा खेळाडू करण शर्माने आघाडीवर राहत नोंदवलेल्या नाबाद 93 धावांच्या बळावर उत्तर प्रदेशने रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीत फेव्हरिट मानल्या जाणाऱया कर्नाटकचा 5 गडय़ांनी पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
उत्तर प्रदेशचा कर्नाटकवरील 13 लढतीतील हा पहिलाच विजय आहे. त्यांची उपांत्य लढत याच ठिकाणी बलाढय़ मुंबईविरुद्ध 14 जूनपासून होणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशला कर्नाटककडून चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला तर 9 सामने अनिर्णीत राहिले होते. पहिल्याच मोसमात यूपी संघाचे कर्णधारपद भूषविणाऱया 23 वर्षीय करण शर्माचा हा केवळ चौथा प्रथमश्रेणी सामना होता. 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने उत्तम टेम्परामेंट दाखविले. त्याआधी प्रियम गर्गने 60 चेंडूत 52 धावा फटकावल्या होत्या. महाराष्ट्रविरुद्ध झालेल्या सामन्यात यूपीने विजय मिळविला, त्यात शर्माने दुसऱया डावात शतक नोंदवत संघाला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून दिले होते.
येथील खेळीत त्याने सावध खेळानंतर अखेरच्या टप्प्यात धावांचा वेग वाढविला. त्याने 163 चेंडूंच्या नाबाद खेळीत 13 चौकार, एक षटकार मारत दोन दिवस बाकी असतानाच संघाला विजय मिळवून दिला. त्याला प्रिन्स यादवने 73 चेंडूत नाबाद 33 धावा जमवित चांगली साथ दिली. दोघांनी अभेद्य 99 धावांची भागीदारी केली. आर्यन जुयल व समर्थ सिंग लवकर बाद झाल्याने त्यांची स्थिती 2 बाद 28 अशी झाली होती. पण गर्गने कर्नाटक गोलंदाजांवर प्रतिहल्ला करीत 57 चेंडूत जलद अर्धशतक नोंदवले. गर्ग बाद झाल्यानंतर रिंकू सिंग, धुव जुरेलही झटपट बाद झाल्याने 5 बाद 114 अशी त्यांची स्थिती झाली. पण शर्मा व प्रिन्स यांनी अभेद्य भागीदारी करून विजय साकार केला.
संक्षिप्त धावफलक ः कर्नाटक प.डाव 253, उत्तर प्रदेश प.डाव 155, कर्नाटक दु.डाव 114, उत्तर प्रदेश दु.डाव 65.2 षटकांत 5 बाद 213 (करण शर्मा नाबाद 93, प्रियम गर्ग 52, प्रिन्स यादव नाबाद 33, व्ही. विजयकुमार 3-47).