नवी दिल्ली
रतन इंडिया एंटरप्रायझेस यांनी नुकतेच इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया रिवोल्ट मोटर्सचे संपूर्णपणे अधिग्रहण केले आहे. रतन इंडिया एंटरप्रायझेसकडे आता यापुढे रिवोल्टचा 100 टक्के वाटा असणार आहे. देशामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक बाईक विक्री करणारी कंपनी म्हणून रिवोल्ट मोटर्सचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. रिवोल्ट मोटर्सचा हरियाणातील मनेसर येथे कारखाना आहे. कंपनीची देशभरामध्ये 30 हून अधिक विक्री केंद्रे आहेत.
कंपनीच्या आर व्ही 400 या मॉडेलला ग्राहकांनी देशातच नव्हे तर विदेशातही चांगला प्रतिसाद नोंदवला आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये अत्यंत आधुनिक अशी ही कंपनीची बाईक जागतिक स्तरावरती नावाजली गेली होती. सदरच्या कंपनीचे अधिग्रहण केलेल्या रतन इंडिया एंटरप्रायझेसला याचा आगामी काळामध्ये लाभ होणार आहे. पर्यावरण शाश्वत वाहनांच्या निर्मितीसाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याचे रतन इंडिया एंटरप्रायझेसकडून सांगण्यात आले आहे.