विविध कंपन्यांचा निर्मितीवर भर ः सध्याची उलाढाल 2500 कोटींची
मुंबई
ऑटोमोबाईल उद्योगात एअर बॅग्ज व्यवसायाची उलाढाल आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 7 हजार कोटीहून अधिक होणार असल्याची माहिती रेटींग एजन्सी इक्रा यांनी दिली आहे.
सध्याच्या स्तरावर पाहता या उद्योगाची उलाढाल ही 2500 कोटी रुपयांची आहे. अलीकडेच केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी मोटारींमध्ये जास्तीतजास्त एअरबॅग्जची व्यवस्था करण्याची सक्ती केली असल्याने आगामी काळामध्ये ऑटो क्षेत्रातल्या दिग्गज कार निर्मात्या कंपन्या एअरबॅग्ज बसवून घेण्याला जास्तीतजास्त प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये या क्षेत्रातील उलाढाल वर म्हटल्याप्रमाणे मोठय़ा प्रमाणात वाढू शकते.
सुरक्षिततेसाठी प्राधान्य
वाहनातील चालक त्याचप्रमाणे इतर कारमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाहनांमध्ये जास्तीतजास्त एअरबॅग्ज बसविण्यासंदर्भात सरकारने नियमावली केली आहे. याची दखल घेत अनेक कंपन्या आता एअरबॅग्ज बसवण्याच्या कार्याला प्राधान्य देत आहेत. 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत या क्षेत्रातील उलाढाल 8 ते 10 हजार कोटीपर्यंत जाणार असल्याचा विश्वास इक्राने व्यक्त केला आहे.
निर्मितीला येणार वेग
सध्याला प्रत्येक कारमागे सरासरी तीन एअरबॅग्ज विकल्या जात आहेत. 1 ऑक्टोबरपासून ही संख्या प्रति कार सहा इतकी होणार आहे. एकदा का नियमावली प्रत्यक्षात अंमलात आली की एअरबॅग्जच्या निर्मितीला वेग येणार आहे. यात एकंदरच 20 ते 25 टक्के इतकी वाढ आगामी काळात निर्मितीमध्ये दिसणार असून हे पाहता एअरबॅग्ज उद्योगाची उलाढाल 2027 पर्यंत 7 हजार कोटींपर्यंत पोहोचेल, असे इक्रा यांनी म्हटले आहे.