इस्कॉन-बेळगाव, संकीर्तन युवक प्रचार केंद्रातर्फे आयोजन : तीन दिवस गावात जयघोष
वार्ताहर /उचगाव
हरे रामा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरेचा जयघोष करीत आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ, इस्कॉन-बेळगाव आणि संकीर्तन युवक प्रचार केंद्र कल्लेहोळ यांच्यावतीने श्रीकृष्ण-बलराम रथयात्रा महामहोत्सव रविवारी कल्लेहोळ येथे मोठय़ा उत्साहात पार पडला.
कल्लेहोळ येथील संकीर्तन युवक प्रचार केंद्र यांच्यावतीने शनिवार दिनांक 7 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता गावामध्ये नगर संकीर्तन, संध्याकाळी 7.30 ते 8 पर्यंत स्लाईड-शो आणि रात्री 8 ते 9 पर्यंत प्रवचन, रात्री 9 ते 9.30 पर्यंत नाटय़लिला आणि प्रसाद असा कार्यक्रम पार पडला. रविवारी दुपारी 2 वाजता श्रीकृष्ण-बलराम रथयात्रेला म. ए. समितीचे युवा नेतृत्व आर. एम. चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि भगवद्गीतेचे पूजन करून गावच्या मुख्य बसस्टॉपपासून सुरुवात करण्यात आली. रात्री लक्ष्मी मंदिरजवळ रथयात्रा
पोहचली.
यावेळी काँग्रेसचे युवा नेतृत्व मृणाल हेब्बाळकर आणि भाजपा नेते धनंजय जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. रथयात्रा संपूर्ण गावभर फिरविण्यात आली.
यावेळी सर्व गावकरी महिला मंडळे, युवकवर्ग मोठय़ा संख्येने रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते. संपूर्ण गावभर भगव्या पताका आणि सुरेख रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. प्रत्येकाच्या कपाळी अष्टगंध लावण्यात आले होते. मराठमोळय़ा वेशात महिलांनी पेहराव केला होता. संपूर्ण गाव हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोषात दुमदुमून गेले होते. सर्व आबालवृद्धही नाच-गाण्यात दंग झाले होते. रात्री 7 ते 8 पर्यंत प्रवचन, रात्री 8 ते 8.45 नाटय़लिला 8.46 ते 9 आरती, रात्री 9 वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.