मार्गताम्हाने वार्ताहर
चिपळूण तालुक्यातील मालघर-टेपवाडी येथील बिबटय़ाच्या हल्ल्यात गाय जखमी झाली. या हल्ल्यात गायीच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला.
मालघर टेपवाडी येथील शेतकरी अजय शंकर लटके यांची गाय त्यांच्या घरामागे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. या दरम्यान बिबटय़ाने तिच्यावर हल्ला केला. मात्र माणसांचा सुगावा लागताच बिबटय़ाने पळ काढला. मालघरमध्ये गेले काही महिने बिबटय़ाचा वावर सुरु आहे. अनेकांना त्याचे दर्शनही झाले आहे. येथील ग्रामस्थ मंगेश महाडिक यांच्या बकऱयांवरही महिनाभरापूर्वी बिबटय़ाने हल्ला केला होता. तसेच मुरलीधर पवार यांच्या गोठय़ातून वासरेही पळवली होती. त्यामुळे येथील जनावरे मालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वनसंरक्षक, पशुसंवर्धन अधिकारी यांना देण्यात आली असून दिवसभरात यापैकी एकही अधिकारी मालघरला फिरकला नसल्याचे लटके यांनी सांगितले. पंचनामा करण्यासाठीही कोणी आले नव्हते.