राजापूर : वार्ताहर
तालुक्यातील अणसुरे आडीवाडीतील दिनेश भिकाजी गावकर (32) या तरूणाचा देवगड पडेल रस्त्यावरील पुरळ कोंडोमा तिठानजीक मोटारसायकलला झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
अणसुरे येथील दिनेश आपल्या कामासाठी मोटरसायकलने देवगडला गेला होता. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास सुमो गाडीने ठोकरल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीय व पोलिसांकडून सांगण्यात आले. सुमोची धडक इतकी जोरदार होती की, दिनेश याचा जागीच मृत्यू झाला. अणसुरे येथील ग्रामस्थांनी व विजयदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमोने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असून सुमो चालक स्वतःहून पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. सुमो चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास विजयदुर्ग पोलीस करत आहेत. देवगड येथे शवविच्छेदन केल्यानंतर दिनेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 21 रोजी सकाळी 10च्या सुमारास आडीवाडी येथील स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनेश मिठगवाणे स्टॉप येथे गॅरेज चालवत होता. एक उत्तम मेकॅनिक व मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून तो सुपरिचित होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर दिनेशच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे अणसुरेसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.