राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी गावाला छावणीचे स्वरूप : बांधकामे काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत : फेबुवारी अखेरपर्यत काम पूर्ण करणार
प्रतिनिधी/चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेतील रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामास गुरूवारी पोलीस बंदोबस्तात प्रारंभ झाला. काम सुरू होण्यापूर्वीच काही व्यावसायिकांनी स्वत:हून बांधकामे काढल्याने फारसा विरोध झाला नाही. यावेळी राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याने सावर्डे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
महामार्गावरील सावर्डे गाव हा सुमारे 54 गावांचे केंद्रबिंदू असून रुंदीकरणावेळी बाजारपेठेतून भरावब्रिज प्रस्तावित होता. त्यानंतर मात्र भराव ब्रिज न करता सिंगल पिलर ब्रिज हवा, यासाठी याची मागणी केली होती. पुलाच्या मागणी व आश्वासनांमुळे सावर्डेत चौपदरीकरण रखडत गेले. चिपळूण टप्प्यातील परशुराम ते खेरशेत या 34 किलोमीटरमध्ये कंत्राटदार कंपनी ईगल इन्फा इंडिया कंपनीने आतापर्यंत 65 टक्केहून अधिक काम पूर्ण केले आहे. फक्त साडेसात किलोमीटरचा जो पट्टा आहे, त्यात परशुराम घाटाचा 500 मीटरचा भाग, शहरातील उड्डाणपूल व सावर्डे बाजारपेठेतील महामार्ग ही तीन कामे फक्त अपूर्ण आहेत. मात्र आता त्याही कामाला आता वेग मिळाला आहे. उड्डाणपुलाबरोबरच अन्य कामे सुरू असतानाच गुरूवारी सावर्डेमध्ये रूंदीकरणाला सुरुवात झाली.
सावर्डे ग्रामपंचायतीकडील बाजूस महामार्गाचे गटाराचे काम झाले. मात्र विरोधी बाजूल असलेले गटार अद्याप झालेले नाही. पहिल्यांदा गटाराचे काम सुरू करावे. त्यानंतर सर्व्हीस रोडच्या कामाला सुरूवात करण्याची मागणी गुरूवारी काही ग्रामस्थांनी केली होती. मात्र त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली. वादातीत जागेतील काम रखडले होते. आता तेथेही चौपदरीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, सावर्डे बाजारपेठेत चौपदरीकरणाचे काम सुरू करताना अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात कामात कोणी हस्तक्षेप केला नाही. यापुढील कालावधीत बाजारपेठेतील चौपदरीकरणाचे काम नियमितपणे सुरू राहणार आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता प्रकाश निगडे, शाखा अभियंता राŸजर मराठे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, सावर्डे पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्यासह कंत्राटदार कंपनीचे जनसंपर्प अधिकारी जयंतीलाल नानेचा, ब्ल्यूम कंपनीचे मुजूमदार आदी उपस्थित होते.