तब्बल दीड किलोमीटर लांब होती स्वागत यात्रा; रत्नागिरीकरांनी अनुभवला आगळावेगळा गुढीपाडवा
रत्नागिरी प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांच्यावतीन दि. 22 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. या यात्रेत विविध चित्ररथांतून भारतीय संस्कृती शिवाय पौराणिक व ऐतिहासीक महत्त्व सादर करण्यात आलेले होते. त्यामुळे यंदाची हिंदू नववर्ष स्वागतयात्रा दरवर्षप्रमाणे यावर्षी नेत्रदीपक ठरली. या स्वागतयात्रेत 54 हून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते तर हजारोंची गर्दी होती. शिवाय या स्वागत यात्रेत 75 हून अधिक संस्थांनी व संघटनांनी सहभाग घेतला होता. रामायण महाभारत शिवकाळ व सामजिक विषयांवर आधारित चित्ररथांमुळे स्वागतयात्रा भरगच्च झाली. शिवाय शिवरुद्रा व ब्रह्मनाद आणि स्थानिक ढोलपथकांच्या वादनाने यात्रा नादमय झाली.
दरम्यान, या स्वागतयात्रेसाठी मोठी तयारी करण्यात आलेली होती. दुभाजकांवर गुढी देखील उभारण्यात आलेल्या होत्या शिवाय ठिकठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. ज्यामुळे संपूर्ण स्वागतयात्रेला चांगलाच उठाव आला.
मारुती मंदिर येथून ही यात्रा 9.30 वाजता सुटली. त्याचप्रमाणे खालून निघणारी स्वागतयात्रा भैरी मंदिरातून 9 वाजता निघाली. या दोन्ही यात्रांचा संगम जयस्तंभ येथे झाला. व तेथून पतितपावन मंदिरात या यात्रेची सांगता झाले. सांगता कार्यक्रमावेळी जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येत प्रतिज्ञा घेतली. सांगता कार्यक्रमाच्या शेवटी गुढीपाडवा तारका घोषित करण्यात आल्या. त्यांना पैठणी देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
यंदाचे आकर्षण ठरले शिवतांडव स्तोत्र
क्षत्रिय राजपूत समाज व मरुधर विष्णू समाज यांच्यावतीने शिव तांडव व नागा साधू यांचा देखावा सादर करण्यात आला. ठिकठिकाणी हा आकर्षक देखावा पाहण्यासाठी गर्दी होती. दिल्लीतून आलेल्या संघाने शिवतांडव व नागा साधू सादर केले. तोंडातून ज्वाळा काढ़ण्यापासून ते आकर्षक वेशभूषा हे सर्व पाहून रत्नागिरीकर थक्क झाले. स्वागतयात्रेच्या सांगतेवेळी पतित पावन मंदिराच्या प्रांगणात पुनश्च शिवतांडव व नागा साधुंचे नृत्य सादर करण्यात आले. यावेळी रत्नागिरीकरांनी बघायला एकच गर्दी केली होती. मात्र आगळ्यावेगळ्या तितक्याच ताकदीच्या सादरीकरणाने ही स्वागतयात्रा रमणीय झाली.
गुढीपाडवा तारका स्पर्धेने महिला समाधानी
हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेत आकर्षक पारंपरिक साज करून अनेक महिला, मुली सहभागी झाल्या होत्या. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुंदर आणि नेत्रदीपक साड्यांची वेशभूषा करणाऱ्या महिलांमुळे स्वागतयात्रेला चारचांद लागले. यंदाच्या स्वागत यात्रेत खास आकर्षण असलेली गुढीपाडवा तारका कार्यक्रमात समीक्षा पाडाळकर, अबोली शेट्ये, माधुरी वाघोले, गौरी देवळे, मधुरा ढेकणे आणि संजना नार्वेकर या 6 गुढीपाडवा तारकांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. या सहा जणींना अक्षता जैन, बिना गणेश भिंगार्डे, मधुरा कांचन मालगुंडकर, संगीता शहा, डिंपल गुंदेचा, भारती जैन, कांचन मालगुंडकर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या स्वागत यात्रेत परीक्षक म्हणून जान्हवी पाटील, मिताली भिडे, अमृता मायनाक, रोशनी सुर्वे, शिवानी भोळे यांनी काम पाहिले
या स्वागत यात्रेचे गुढीपाडवा तारका ही स्पर्धा खास आकर्षणाचा विषय ठरली.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा 2023 मध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ तर्फे व श्री गणेश वस्त्र निकेतन चे संजू जैन गुढीपाडवा तारका ही महिला, युवतींसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती