लाचलुचपत विभागाची कारवाई; ‘सातबारा’साठी केली 7 हजार रूपयांची मागणी
दापोली प्रतिनिधी
वडिलांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या जागेवर नाव लावून सातबारा उतारा देण्यासाठी दापोली तालुक्यातील सुकोंडी येथील तलाठी अक्षय पाटील हे 7 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. यामुळे दापोली महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
दापोली तालुक्यातील सुकोंडी येथील एका ग्रामस्थाने वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची जमीन नावावर होण्यासाठी सुकोंडीचे तलाठी अक्षय पाटील यांच्याकडे अर्ज सादर केला होता. जमीन त्यांच्या नावावर करून तसा 7/12 उतारा देण्यासाठी अक्षय पाटील यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली व 7 हजार रूपयांवर तडजोड करण्यात आली. या बाबत अक्षय पाटील यांच्याविरोधात रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाईमध्ये अक्षय पाटील यांनी लाच मागणी केल्याचे निष्पˆ झाले. अक्षय पाटील यांनी 7 हजार रुपये लाच 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1.45 वाजता दापोली नगर पंचायतीच्या रस्त्यासमोर स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर, वाहनचालक प्रशांत कांबळे यांनी सहभाग घेतला.