जिल्हा वनविभाग, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी
देवरुख प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे संगमेश्वर गावात झालेल्या बिबट्याच्या शिकारीचे गुढ वाढले असून विविध चर्चेला उधाण आले आहे. घटना घडल्याचे वनविभाग मान्य करत आहे तर पोलिसांनीही घटनास्थळी जावून दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. मात्र शिकार झालेला बिबट्या आहे कुठे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. यानंतर यातील ताब्यात घेतलेल्यांना सोडून देण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणात काहीतरी गोलमाल असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
संगमेश्वरपासून 12 कि.मी. अंतरावरील वाशी गावात बिबट्याची हत्या करून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची तसेच यात मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा खुलेआम सुरू होती. यानुसार माहिती घेण्यासाठी देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 5-7 दिवसापूर्वी ही घटना घडल्याचे मान्य केले. मात्र या बाबतीत सर्व तपास संगमेश्वर पोलीस करत असून त्यांनीच संशयितांना ताब्यात घेतले होते, अशी माहिती दिली.
यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस. निरिक्षक प्रवीण देशमुख यांच्याशी संपर्प साधला असता त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी एक निनावी पत्र आले होते. यात बिबट्याची हत्या करून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे नमूद करण्यात आले होते. यानुसार आम्ही वनविभागाला याची माहिती दिली आणि त्यांच्यासोबत घटनास्थळी गेलो होतो, मात्र त्या ठिकाणी आम्हाला काहीच सापडले नाही. तरी चर्चेच्या आधारे दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र त्यांच्याकडूनही काही माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले
बिबट्याचे नेमके झाले तरी काय?
एकीकडे वनविभाग घटना घडल्याचे मान्य करत असले तरी सर्व तपास संगमेश्वर पोलीस करत असल्याचे सांगत आहेत तर पोलीस वनविभागाला याची कल्पना दिल्याचे सांगत आहेत. तसेच दोघांना ताब्यात घेऊन सोडून दिल्याचेही स्पष्ट करत आहेत. मग यातील बिबट्याचे नेमके झाले तरी काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मुळात हा सर्व विषय वनविभागाच्या अंतर्गत येतो, पण तेच यातून अंग काढून घेत सर्व काही पोलीस करत असल्याचे सांगत असल्याने घटनेतील गुढ वाढले आहे. जर पोलीस आणि वनविभाग घटनास्थळी गेले तर त्याचा पंचनामा कसा नाही किंवा वनविभागाकडे याची नेंद कशी नाही, यामुळे या प्रकरणात जिल्हा वनविभागाने व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून यातील सत्य बाहेर आणावे, अशी मागणी होत आहे.