प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह उर्वरित पथक लंडनमध्ये दाखल, लिसेस्टरमध्ये सराव सत्र
बेंगळूर / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला कोरोनाची बाधा झाली असून यामुळे तो अन्य संघसहकाऱयांसमवेत इंग्लंडला रवाना होऊ शकलेला नाही, अशी माहिती बीसीसीआय पदाधिकाऱयांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. अश्विन सध्या क्वारन्टाईन असून सर्व प्रोटोकॉल पूर्ण झाल्यानंतर तो इंग्लंडकडे रवाना होऊ शकेल.
भारतीय पथक दोन टप्प्यात इंग्लंडकडे रवाना झाले असून 16 जून रोजी काही खेळाडू तेथे पोहोचले तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमवेत संघातील उर्वरित खेळाडू रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत अश्विनचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
वेळेत पोहोचू शकत नसल्याने अश्विन आता लिसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळू शकणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. आयपीएल स्पर्धेनंतर अश्विनने तामिळनाडू लीगमध्ये सहभाग घेतला. त्या लढतीत त्याने 20 षटके गोलंदाजी केली होती.
पहिल्या टप्प्यात भारतीय संघातील काही खेळाडू यापूर्वीच लिसेस्टरला पोहोचले असून गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्बरे व फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सराव सुरु केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमवेत रिषभ पंत व श्रेयस अय्यर मंगळवारी लंडनला पोहोचले. ते मंगळवारी उशिराने लिसेस्टरमध्ये दाखल झाले. दरम्यान, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणाखाली आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी समाविष्ट खेळाडू दि. 23 किंवा 24 जून रोजी डब्लिनला पोहोचतील, अशी अपेक्षा आहे.