आमदार प्रवीण आर्लेकर यांची ग्वाही : चांदेल – हसापूर येथे रंगमंच उभारण्याचा शुभारंभ
पेडणे : गावागावात कलाकार जन्माला येत आहे आणि या कलाकाराला जर योग्य ते व्यासपीठ उपलब्ध झाले तर तो आपली कला उच्च स्तरावर पोहोचवू शकतो. त्यासाठी गावागावात रंगमंच उभारून कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कलाकारांना त्यांच्या कला गुणांचे सादरीकरण करण्यासाठी आणि योग्य ते प्रशिक्षण घेण्यासाठी लवकरच पेडणे मतदारसंघात रवीद्र भवन उभारले जाईल, अशी ग्वाही आमदार प्रवीण आर्लेकर यांनी चांदेल हसापूर पंचायत क्षेत्रातील रंगमंच उभारणी बांधकामाचा शुभारंभ केल्यानंतर दिली. यावेळी चांदेल सरपंच तुळशिदास गावस, उपसरपंच ऊची मळीक, पंच प्रजय मळीक, बाळा शेटकर, आनंद गावस, आरती गावस , अऊण गावस, दत्ता गावस, वर्षा मिशाल आदी नागरिक उपस्थित होते. आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते आणि सरपंच तुळशीदास गावस पंचमंडळी यांच्या उपस्थितीत या नवीन रंगमंचाच्या बांधकामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला.
पेडणे तालुका ही कलाकारांची खाण आहे. या खाणीमधून अनेक कलाकार जन्माला आले आणि जन्म घेत आहेत. त्या कलाकारांनी आपल्या कलेबरोबर आपले, आपल्या गावचे, तालुक्मयाचे, राज्याचे आणि देशाचेही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे. अशा कलाकारांना जर योग्य वेळी व्यासपीठ उपलब्ध झाले तर त्यांची कला त्यांना सादर करण्यास वाव मिळत असतो. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आणि पंचायतीच्या सहकार्यातून गावागावात रंगमंच उभारण्यात येईल, असे प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. गावच्या सर्वांगीण विकासाबरोबरच नियोजनबद्ध असा विकास करण्यासाठी सरकारच्या आणि आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सहकार्यातून विकास केला जाईल त्यासाठी प्रत्येक नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. विकास करत असताना कोणीही कुठेही आडकाठी आणू नये, असे आवाहन सरपंच तुळशीदास गावस यांनी केले.