ऑनलाईन टीम / तरुण भारत :
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी संमेलनाच्या तारखाही ठरवण्यात आल्या. अंमळनेर येथे 2, 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 ला हे संमेलन होणार आहे.
यापूर्वी पुण्यामध्ये झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनस्थळ म्हणून अंमळनेरची निवड करण्यात आली होती. त्यानंतर प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.
यासंदर्भात आज साहित्य महामंडळाची बैठक झाली. बैठकीला महामंडळाच्या सर्व घटक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. बैठकीत कार्यक्रमाच्या रुपरेषेचा आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा सादर होऊन एकमताने मंजूर करण्यात आला.