मणिपूरमध्ये ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारून त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर दंगलीच्या पार्श्वभुमीवर सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. या बैठकीला एनडीएच्या घटकपक्षाबरोबरच विऱोधी पक्षांचे प्रतिनिधीही हजर राहणार होते. या सर्वपक्षीय बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. आज ते पुण्यातून दिल्लीसाठी विमानाने रवाना होणार होते. पण ते आज या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिलेल्या माहीतीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खराब हवामानामुळे त्यांचा दौरा रद्द करावा लागला. दौरा रद्द झाल्याने मुख्यमंत्र्यानी मराठा मंदिर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील धर्मादाय संस्थेच्या 75 व्या वर्धापन दिनाला हजेरी लावली. 1 जून रोजी मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतही आणि भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती.